Ashok Kharat Case: स्वतःमध्ये चमत्कारी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अशोक खरात याच्या दैनंदिन दिनचर्येबाबत नवी माहिती समोर आली आहे. गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगाची हवा खात असलेल्या या संशयित भोंदूबाबाने सध्या कारागृहातील इतर कैदी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वैतागून मौन व्रत धारण केले आहे. एरवी लोकांचे भविष्य सांगणारा हा भोंदू आता स्वतःचे भविष्य अंधारात पाहून पहाटे लवकर उठून केवळ ध्यान धारणा आणि मंत्रोच्चार करत विशेष साधना करण्यात वेळ घालवत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र बराकीत रवानगी; व्हीआयपी वागणूक नाकारली
न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातला कारागृह प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून इतर कैद्यांपासून दूर एका वेगळ्या बराकीत ठेवले आहे. कारागृहातील कर्मचारी आणि काही कैदी सातत्याने त्याला त्याच्या तथाकथित दैवी शक्तीबद्दल आणि स्वतःच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. हा त्रास टाळण्यासाठी त्याने मौन पाळणे पसंत केले आहे. दरम्यान, कारागृह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातला कोणतीही विशेष सुरक्षा किंवा व्हीआयपी सवलत देण्यात आलेली नाही. एका सामान्य अंडरट्रायल कैद्याप्रमाणेच त्याला तुरुंगात वागणूक दिली जात आहे.
गंभीर गुन्ह्यांची मालिका; नव्या तक्रारींमुळे अडचणीत वाढ
धार्मिक विधी आणि अध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण करणे, हा खरातवरील मुख्य आरोप आहे. त्याशिवाय, त्याने भाविकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या 4 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातविरोधात आता नवनवीन पीडित व्यक्ती पुढे येऊन तक्रार दाखल करत आहेत. त्यामुळे आगामी काळात त्याच्यासमोरील कायदेशीर अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.