Akola Crime: अकोल्यातील पातुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता अकोल्यात एका 60 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या चिमुरडीला आपल्या वासनेचा बळी बनवले आहे. शेजारीच राहणाऱ्या या वृद्धाने निरागस बालिकेच्या असहायतेचा फायदा घेत गेल्या चार-पाच दिवसांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. तिचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी रोज शेतात मोलमजुरीला जातात. घरात कोणीही नसल्याची संधी साधून नराधम वृद्धाने चिमुकलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. भीतीच्या सावटाखाली असलेल्या या बालिकेने सुरुवातीला कोणाकडेच काही सांगितले नाही, मात्र काल धीर एकवटून तिने पालकांकडे सर्व हकीकत सांगितली. मुलीची आपबिती ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.
पोलिसांची कारवाई आणि आरोपीचा शोध
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा उघडकीस येताच आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.
पुण्यातील दोन घटनांनीही महाराष्ट्र हादरला
पर्वती (पुणे): एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या स्वतःच्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. नराधमाने नातवाला खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवले आणि नातीशी अघोरी चाळे करण्यास सुरुवात केली. सुदैवाने शेजारील महिलेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नसरापूर (पुणे): आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिला दगडाने ठेचून संपवलं. गुन्ह्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. ग्रामस्थांनी पकडून दिल्यानंतर पोलिसांनी या क्रूर आरोपीला ताब्यात घेतले आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजात तीव्र संतापाची लाट आहे. अशा नराधमांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.