Kamakhya Temple In Nashik: अध्यात्म आणि पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जात आहे. आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरानंतर, आता देशातील या देवीचे दुसरे भव्य मंदिर नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे उभे राहत आहे. या मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून, ऑगस्ट 2026 मध्ये हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. या मंदिरामुळे नाशिक जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनाला नवी झळाळी मिळणार आहे.
राजस्थानी आणि बंगाली कलाकुसरीचा सव्वा एकरवर विस्तार
धारणगाव खडक येथील सुमारे 1.25 एकर जागेवर हे मंदिर आकाराला येत आहे. मंदिराच्या सौंदर्यासाठी आणि मजबुतीसाठी देशभरातील विविध प्रांतांतील स्थापत्यशैलीचा वापर करण्यात आला आहे. मंदिराला एकूण 111 भव्य खांब असून त्यावर अत्यंत आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मंदिरावर एकूण 21 कळस असून, त्यापैकी मुख्य 3 कळस सोन्याचे असणार आहेत. हे भव्य कार्य पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सुमारे 250 कुशल कारागीर दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
धार्मिक महत्त्व आणि मंदिराची रचना
पौराणिक संदर्भानुसार, जिथे देवी सतीचे भाग पडले ती ठिकाणे शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. निफाडमधील या मंदिराची उभारणी देवी सतीच्या दृष्टांतानंतर करण्यात येत असल्याची माहिती गणेश महाराज जगताप यांनी दिली आहे. मंदिराच्या परिसरात केवळ कामाख्या देवीच नाही, तर चारी दिशांना विविध देवतांची मंदिरे आहेत. पूर्वेला भव्य गणेश मंदिर, पश्चिमेला शिव-पार्वती मंदिर, उत्तरेला धन कुबेर, धनलक्ष्मी व धनदीप मंदिर आणि आग्नेयेला सप्तशती चंडी हवन कुंडाची स्थापना करण्यात आली आहे.
हेही वाचा – Tiger Roar : वाघाच्या डरकाळीचा अर्थ काय असतो? आक्रमकता, संवाद की भीती? इतक्या दूरपर्यंत ऐकू जातो आवाज
ऑगस्टमध्ये होणार भव्य लोकार्पण
येत्या ऑगस्ट महिन्यात मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर साधू-संत आणि महंतांच्या उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व आणि आता निफाडमध्ये उभे राहणारे हे भव्य कामाख्या मंदिर यामुळे भाविकांसाठी हे एक प्रमुख श्रद्धास्थान ठरणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.