Ketan Agrawal Pune Lohagad Case : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल याच्या दुर्दैवी हत्याकांड प्रकरणात केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली संमती दर्शवली आहे.
‘पोलिसांचा तपास हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग’
यानंतर या प्रकरणावर उज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हे प्रकरण आव्हानात्मक आहे; मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे अग्रवाल कुटुंबीयांची मागणी सांगितली,’ असे उज्वल निकम म्हणाले. तसेच, पोलिसांचा तपास हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग ठरणार असून, हे प्रकरण लॉजिकल एंडला घेऊन जाणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाल अग्रवाल यांना दिले.
केतन अग्रवालची कट रचून क्रूर हत्या; देशभरात खळबळ
18 जून रोजी केतन अग्रवालची लोहगड किल्ल्याजवळील दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासानुसार, सियाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी दोघे लोहगड किल्ल्यावर गेले होते, तेथे फोटो काढण्याच्या बहाण्याने केतनला दरीच्या कडेला उभे करण्यात आले आणि त्यानंतर सिया व चेतन यांनी त्याला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.