Amruta Fadnavis New Song: 1 मे 2026, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गायिका अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करणारे ‘नमन तुला’ हे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासावर आधारित या गौरवगीताला रिलीज होताच काही तासांत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे गाणे महाराष्ट्राची अस्मिता आणि सांस्कृतिक अभिमान जपणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
रितेश देशमुखची विशेष उपस्थिती आणि दिग्गज टीम
या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याची या व्हिडिओमधील विशेष झलक. ‘T-Series’च्या बॅनरखाली तयार झालेल्या या गाण्याला दिग्गज संगीतकार अनु मलिक यांनी संगीत दिले आहे, तर चैतन्य कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केले आहे. शक्ती हसिजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या म्युझिक व्हिडिओची कोरिओग्राफी पवन बॉब यांनी केली आहे. या दिग्गजांच्या एकत्र येण्यामुळे गाण्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
नऊवारी साडी आणि अस्सल मराठमोळा लूक
या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांचा अस्सल मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध डिझायनर नचिकेत बर्वे यांनी डिझाइन केलेली निळ्या रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये त्या अत्यंत प्रभावी दिसत आहेत. “हे गाणे शिवरायांच्या चरणी आणि आपल्या गड-किल्ल्यांच्या इतिहासाला अर्पण केलेले एक वंदन आहे,” अशा भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस आणि या वर्षातील कामगिरी
नेहमीप्रमाणेच अमृता फडणवीस यांच्या या नवीन गाण्यावरही नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या या धाडसी प्रयोगाचे कौतुक केले आहे, तर काहींनी आपल्या खास शैलीत मते मांडली आहेत. 2026 या वर्षात अमृता फडणवीस यांची ही तिसरी मोठी रिलीज आहे. जानेवारीमध्ये त्यांचे ‘किसी की मुस्कुराहटो पे’ हे कव्हर व्हर्जन आणि महाशिवरात्रीला ‘शंभू रे’ हे भजन प्रदर्शित झाले होते. आता 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘नमन तुला’ गाण्याने यूट्यूबवर मोठी लोकप्रियता मिळवली आहे.