Abhinay Subhedar: मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांचा प्रश्न गंभीर झाला असतानाच, महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमधून सुखरूप भारतात परतला आहे. आज विशाखा आणि अभिनय यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
नेमकं काय घडलं होतं?
अभिनय सुभेदार हा कुवेत मार्गे लंडनला जात होता. मात्र, तो कुवेत विमानतळावर असतानाच इराणने ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कुवेतचे हवाई क्षेत्र (Airspace) तात्काळ बंद करण्यात आले आणि अभिनय तिथेच अडकला. बाहेर युद्धाचा भडका उडाला असताना आपला मुलगा परदेशात अडकल्याने विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करून सरकारकडे मदतीची याचना केली होती.
विशाखा सुभेदार यांच्या आवाहनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली. कुवेतमधून बाहेर पडण्यासाठी सौदी अरेबियाचा व्हिसा आवश्यक होता, जो मिळणे कठीण झाले होते. राज्य सरकारने दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. अधिकारी असीम महाजन यांच्या मदतीने अभिनयला तात्काळ सौदीचा व्हिसा मिळवून देण्यात आला. अभिनयसह 30 महाराष्ट्रीय प्रवाशांनी रस्ते मार्गाने कुवेतमधून सौदीतील रियाधपर्यंत 10 तासांचा प्रवास केला आणि तिथून विमानाने मुंबई गाठली.
हेही वाचा – Alia Bhatt: ‘बेबी…!’ वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिला सुखद धक्का; ‘राहा’नंतर नव्या पाहुण्याचं आगमन?
भेटीतील भावूक क्षण
ठाण्यातील भेटीदरम्यान विशाखा सुभेदार यांना अश्रू अनावर झाले. “माझा मुलगा सुखरूप परत येईल अशी आशा मी सोडून दिली होती, पण सरकारने दाखवलेल्या तत्परतेमुळेच आज तो माझ्यासोबत आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “संकटात सापडलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्यच आहे. अभिनय सुखरूप परतला याचा आम्हाला आनंद आहे.”