Beed Crime : माणुसकीला काळीमा फासणारी एक अमानवीय घटना बीडच्या केज तालुक्यातून समोर आली आहे. ज्या आजोबांच्या हाताला धरून चिमुकलीने चालायला शिकावे, त्याच 50 वर्षीय आजोबाने स्वतःच्या 3 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून, युसुफवडगाव पोलिसांनी नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत.
आईकडे बोलली अन् पाशवी कृत्य समोर आले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिथेच तिच्या नराधम वडिलांनी 16 ते 25 एप्रिल या काळात संधी साधून चिमुकलीवर वारंवार अत्याचार केले. या क्रूर कृत्यामुळे निरागस मुलीला प्रचंड शारीरिक वेदना होऊ लागल्या. शेवटी असह्य झाल्याने तिने आपली आपबिती आईला सांगितली. स्वतःच्या वडिलांनीच लेकीच्या जीवाशी हा खेळ खेळल्याचे समजताच आईने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस कारवाई आणि ‘पिंक पथका’चा धाक
आईने दिलेल्या तक्रारीनंतर युसुफवडगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याच्या कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी शोधमोहीम राबवून 1 मे 2026 रोजी रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध कलम 64(2), 65(2) आणि पोक्सोच्या कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कठोर शिक्षेची मागणी
रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमनातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला समाजात स्थान असू नये आणि त्याला फाशी किंवा जन्मठेपेचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.