MI vs RCB: भारतीय संगीत क्षेत्रातील देदिप्यमान तारा, गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देश शोकाकुल झाला. या दुःखद घटनेचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही उमटले. आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या 20 व्या सामन्यापूर्वी आशा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली, ज्याचा शोक क्रिकेट विश्वातही दिसून आला.
हातावर काळ्या पट्ट्या आणि एका मिनिटाचे मौन; खेळाडूंचा ‘आशा’ दीपकाला सलाम
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांतील खेळाडू, पंच आणि स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी उभे राहून एका मिनिटाचे मौन पाळले. आशा ताईंचे क्रिकेटवर आणि खेळाडूंचे त्यांच्या गाण्यांवर अलोट प्रेम होते. हेच नाते अधोरेखित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले. सोशल मीडियावरही अनेक क्रिकेटपटूंनी आशा ताईंच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मैदानावरील हे वातावरण अत्यंत भावूक झाले होते.
हार्दिकने जिंकली नाणेफेक; मुंबईच्या संघात दोन महत्त्वाचे बदल
या शोकाकुल वातावरणात खेळ सुरू झाला तेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबईने दोन मोठे बदल केले असून एम. गझनफर आणि दीपक चहर यांच्या जागी मिचेल सँटनर आणि मयंक मार्कंडे यांना संधी दिली आहे. वानखेडेची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल, असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला.
A moment of silence at Wankhede as we remember and pay tribute to the legendary Asha Bhosle Tai. Our players are wearing black armbands as a mark of respect. pic.twitter.com/YyHUYd8EY5 — Mumbai Indians (@mipaltan) April 12, 2026
आरसीबीच्या ताफ्यात जेकब डफीचे पुनरागमन
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानेही आपल्या गोलंदाजी विभागात एक बदल केला आहे. अनुभवी जोश हेझलवुडच्या जागी न्यूझीलंडच्या जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे. आरसीबीचा संघ वानखेडेच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने उतरला आहे. मात्र, खेळाच्या तांत्रिक बाजूंपेक्षाही आजच्या सामन्याची चर्चा ही दिग्गज गायिका आशा भोसले यांना दिलेल्या सन्मानामुळेच अधिक होत आहे.