Congress Corporator Accident: नागपूरचे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या वाहनाला मध्य प्रदेशात एक भीषण अपघात झाला. शुभम मोटघरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातील आपला दौरा आटोपून नागपूरच्या दिशेने परतत होते. प्रवास सुरू असताना अचानक त्यांच्या वाहनासमोर एक नीलगाय धावत आली.
वन्यजीव अचानक समोर आल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला. नियंत्रण सुटलेली कार रस्त्यावरून घसरून 3 ते 4 वेळा उलटली आणि थेट महामार्गावरील एका पुलाखाली कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण होता, मात्र सुदैवाने मोटघरे आणि त्यांचे सहकारी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
वन्यप्राणी समोर आल्याने अपघात
अपघातग्रस्त झालेले शुभम मोटघरे हे नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग 26 चे प्रतिनिधित्व करतात. स्थानिक पातळीवर काँग्रेसचे सक्रीय तरुण नेते म्हणून त्यांची ओळख आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले, तरी कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातातून नगरसेवक आणि त्यांचे सहकारी सुरक्षित बाहेर आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. वन्य प्राण्यांच्या अचानक येण्याने महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.