Gold Price Today : सोमवारच्या सकाळची सुरुवात सोने-चांदीच्या खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या किमतीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर दबाव निर्माण झाला असून, भारतीय बाजारपेठेतही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण
जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता मौल्यवान धातूंच्या किमतीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1.38 टक्क्यांनीनी घसरून 4462 डॉलर प्रति औंसवर आले आहेत, तर चांदीमध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांनी आपली पावले जपून टाकण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील प्रमुख शहरांतील सोन्याचे ताजे दर (प्रति 10 ग्रॅम)
भारतीय बाजारपेठेतही सोन्याच्या भावात लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर प्रमुख शहरांतील भाव बदलले आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरू, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,35,740 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,48,080 रुपये इतका नोंदवला गेला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 22 कॅरेटसाठी 1,35,890 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 1,48,210 रुपये मोजावे लागत आहेत. दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने थोडे जास्त असून, तिथे 22 कॅरेटचा भाव 1,36,590 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 1,49,010 रुपये इतका झाला आहे.
चांदीच्या किमतीतही मोठी घसरण
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 30 मार्चच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,44,900 रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला 4,00,000 चा टप्पा ओलांडलेली चांदी आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येताना दिसत आहे. दिल्लीच्या बाजारात तर चांदी एकाच दिवसात 11,250 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
घसरणीचे मुख्य कारण काय?
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिका-इराण युद्धाचा 5 वा आठवडा सुरू असल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार यामुळे सोन्यावरील दबाव वाढला असून, परिणामी किमती खाली आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण लग्नसराईच्या काळात खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते.