Mahesh Tutorials: महाराष्ट्रातील नामांकित आणि एकेकाळी पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली 'एम.टी. एज्युकेअर लिमिटेड' (महेश ट्युटोरियल्स) ही खाजगी कोचिंग संस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. गेली 38 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या या संस्थेने अचानक राज्यातील आपल्या सर्व शाखा बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी, तसेच नीट (NEET) आणि जेईई (JEE) सारख्या व्यावसायिक प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या क्लासची मोठी क्रेझ होती. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक वर्ग बंद झाल्यामुळे लाखो रुपयांची फी भरलेल्या हजारो पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे.
दिवाळखोरीचे कारण देत तातडीने गाशा गुंडाळला
अंतर्गत आर्थिक टंचाई आणि दिवाळखोरीमुळे व्यवस्थापनाने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, 7 जुलै रोजी सर्व शाखा प्रमुखांची एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर, अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच 10 जुलैपासून राज्यातील सर्व सेंटर्स तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. मुंबईतील बाधित विद्यार्थ्यांना 'अरिहंत अकॅडमी' आपल्याकडे सामावून घेणार असल्याचे समजते, परंतु इतर शहरांमधील विद्यार्थ्यांचे काय होणार आणि पालकांनी भरलेले पैसे परत मिळणार की नाही, याबद्दल अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पालकांनी विविध शाखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सर्व ठिकाणचे फोन बंद असल्याचे समोर आले आहे.
कर्जाचा डोंगर आणि मुलुंड ते मुंबईपर्यंत पसरलेल्या शाखांना फटका
मुंबईतील मुलुंड भागातून अगदी छोट्या प्रमाणावर सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात झाला होता. कंपनीच्या एकूण 60 शाखांपैकी तब्बल 40 शाखा केवळ मुंबई आणि आसपासच्या महानगर क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून या संस्थेची आर्थिक घसरण सुरू होती. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अंतर्गत ऑडिट अहवालात संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमधील मोठ्या त्रुटी आणि अनियमितता चव्हाट्यावर आल्या होत्या. सध्या कंपनीवर सुमारे 32.33 कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून, काही वादग्रस्त कॉर्पोरेट हमींच्या कायदेशीर कचाट्यात कंपनी अडकल्याने ही नामांकित संस्था पूर्णपणे कोलमडली आहे.