IndiGo Flight Cancellation : बंगळूरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport, Bengaluru) मंगळवारी, 3 डिसेंबरला, इंडिगो एअरलाइनच्या एकूण 42 विमानांची उड्डाणे रद्द (IndiGo Flights Cancelled) करण्यात आली. यात 22 विमानांचे आगमन आणि 20 विमानांचे प्रस्थान समाविष्ट होते. एवढ्या मोठ्या संख्येने विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या दिवशी इतकी विमाने रद्द होण्याची ही घटना आहे; कारण 2 डिसेंबरला याच विमानतळावर इंडिगोची 20 विमाने रद्द झाली होती.
'ऑपरेशनल समस्या' कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने रद्द होण्यामागे 'ऑपरेशनल समस्या' हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. प्रभावित झालेल्या अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला. दिल्ली, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, गोवा, कोलकाता आणि लखनऊ यांसारख्या शहरांतून येणारी विमाने रद्द झाली, तर मुंबई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद येथे जाणारी विमानेही प्रभावित झाली.
हेही वाचा – Illegal Loan Apps: 87 बेकायदेशीर लोन अॅप्स ब्लॉक; डिजिटल फसवणुकीवर सरकारचा मोठा घणाघात
एअरलाइनकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही
विमाने रद्द होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, तसेच इंडिगोकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण (IndiGo Official Comment) आलेले नाही. मात्र, 29 नोव्हेंबरला इंडिगोने आपल्या A320 सीरीजच्या विमानांची तपासणी (IndiGo Inspection) आणि अपडेट्स (IndiGo Updates) करण्यासंबंधी एक निवेदन जारी केले होते. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) आणि एअरबसने (Airbus) जारी केलेल्या निर्देशांचे पूर्ण पालन करून ही कारवाई करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले होते.
विमान तपासणी आणि 200 विमानांचे ऑडिट
एअरलाइनने त्यांच्या निवेदनात म्हटले होते की, एकूण 200 विमानांची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 160 विमानांवर आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे, तर उर्वरित विमानांवरील काम निश्चित वेळेत पूर्ण केले जाईल. या तपासणीमुळे कोणतीही उड्डाणे रद्द होणार नाहीत, मात्र काही विमानांना किमान विलंब होऊ शकतो, असे इंडिगोने यापूर्वी स्पष्ट केले होते.
इतर विमानांनाही तांत्रिक बिघाड
या गोंधळामुळे केवळ इंडिगोच नाही, तर इतर विमानेही प्रभावित झाली. 2 डिसेंबरला बंगळूरुहून हैदराबाद, विजयवाडा आणि नागपूरला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसची (Air India Express) तीन विमाने तांत्रिक बिघाडामुळे (Technical Snag) विलंबित झाली होती.
हेही वाचा – Air India: टाटा समूहाची डोकेदुखी वाढली! वैध परवान्याशिवाय आठ उड्डाणे; एअर इंडियावर कारवाईची टांगती तलवार