108 Maoists Surrendered : मोठे यश! 108 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; इतक्या कोटींची रोकड, सोने आणि शस्त्रास्त्रे जप्त

जगदलपूर येथील पोलीस समन्वय केंद्रात हा आत्मसमर्पणाचा सोहळा पार पडला. शरण आलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकून मोठी जप्ती केली आहे.

108 Maoists Surrendered : मोठे यश! 108 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; इतक्या कोटींची रोकड, सोने आणि शस्त्रास्त्रे जप्त

108 Maoists Surrendered in Bastar : छत्तीसगडमधील बस्तर विभागात माओवादाविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. "पूना मारगेम – पुनर्वसनातून पुनरुज्जीवन" या मोहिमेअंतर्गत तब्बल 108 माओवाद्यांनी बुधवारी सामूहिक आत्मसमर्पण केले. या शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये 44 महिलांचा समावेश असून, त्यांच्यावर एकूण 3.29 कोटी रुपयांचे बक्षीस होते. माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे बस्तरमधील माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

ऐतिहासिक शस्त्रसाठा आणि मालमत्ता जप्त
जगदलपूर येथील पोलीस समन्वय केंद्रात हा आत्मसमर्पणाचा सोहळा पार पडला. शरण आलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकून मोठी जप्ती केली आहे. यामध्ये 101 अत्याधुनिक शस्त्रे (AK-47, INSAS, SLR, LMG आणि BGL लाँचर्स), 3.61 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 1.64 कोटी रुपये किमतीचे 1 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. माओविरोधी अभियानाच्या इतिहासातील ही एकाच ठिकाणाहून झालेली रोख रकमेची सर्वात मोठी जप्ती मानली जात आहे.

मुख्य प्रवाहातील स्वागत आणि पुनर्वसन
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये पाच विभागीय समिती सदस्यांसह एरिया आणि प्लॅटून स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी माहिती दिली की, शरण आलेल्या माओवाद्यांचे गुलाबाचे फूल आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत या माजी माओवाद्यांना आर्थिक मदत, कौशल्य विकास, घर, शिक्षण आणि उपजीविकेसाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जाणार आहे. गेल्या 26 महिन्यांत छत्तीसगडमध्ये 2,714 माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : 'भारताने कुणाकडून तेल खरेदी करायचं हे अमेरिका ठरवतं'; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात

माओवाद निर्मूलनासाठी 31 मार्चची डेडलाईन
देशातून माओवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. आता या मुदतीला केवळ 20 दिवस शिल्लक असताना, एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या आत्मसमर्पणामुळे उर्वरित सशस्त्र माओवाद्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. नारायणपूर जिल्ह्यातून सर्वाधिक 49 शस्त्रे जप्त करण्यात आली, तर बस्तरमधून 24 आणि सुकमामधून 12 शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे दक्षिण छत्तीसगडमधील 'दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी'चे कंबरडे मोडले आहे.

हिंसा सोडा आणि सन्मानाने जगा
आयजी पी. सुंदरराज यांनी उर्वरित माओवाद्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हिंसाचार सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. बस्तरमधील संघर्ष आता चकमकींच्या पलीकडे जाऊन पुनर्वसनाकडे वळला आहे. 1 जानेवारी 2024 ते 9 मार्च 2026 या काळात एकट्या बस्तर विभागात 2,625 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, जे या भागात बदलत असलेल्या परिस्थितीचे निदर्शक आहे. सरकार त्यांना सुरक्षा आणि सन्मानजनक भविष्य देण्यासाठी कटिबद्ध आहे.

हेही वाचा – Crime News : 325 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी आणि रोख रक्कम…; लेकीच्या लग्नाला बाहेर गावी गेलेल्या ज्वेलर्सच्या घरावर दरोडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number