BMC Election Results 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) मतमोजणीचे कल हाती येताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने बहुमताच्या दिशेने मोठी मजल मारली असून, या विजयाचा आनंद भाजप नेत्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मुंबईत भाजपचाच महापौर बसणार,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आशिष शेलारांचा विजयाचा विश्वास
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची युती 101 जागांवर आघाडीवर आहे. विजयाचे हे चित्र स्पष्ट होत असताना आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “मुंबईत महायुतीच्या विजयाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईकर जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला असून, आगामी काळात मुंबईत भाजपचा महापौर विराजमान होईल. मात्र, संपूर्ण निकाल अधिकृतपणे हाती आल्यावरच सविस्तर भाष्य करू.”
थेट तिरंगी लढतीत महाविकास आघाडी पिछाडीवर
या निवडणुकीत मुंबईत पहिल्यांदाच तिरंगी लढत पाहायला मिळाली. एकीकडे भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती होती, तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उबाठा) यांनी युती करून आव्हान उभे केले होते. या ठाकरे बंधूंच्या युतीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठबळ दिले होते. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंतच्या कलांनुसार ही आघाडी 67 जागांवर अडकली आहे. तसेच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या गटाला केवळ 9 जागांवर आघाडी मिळवता आली आहे.
मुंबईच्या सत्तेचा पेच सुटणार?
मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या ठाकरे गटाच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने मुंबईत केलेला प्रचार आणि विकासकामांच्या जोरावर मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे चित्र आहे. आता अंतिम निकालानंतर आशिष शेलार यांचा दावा किती खरा ठरतो आणि मुंबईचा पुढचा महापौर कोण होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.