IPL 2026 Auction: आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंना आयपीएलमधून ओळख मिळाली असून त्यांचे करिअर घडले आहे. आता आयपीएल 2026 हंगामाच्या तयारीला वेग आला असून सर्व संघांनी आपापल्या रिटेन्शन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंच्या याद्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केल्या आहेत. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मिनी लिलावाकडे लागले आहे.
कधी आणि कुठे होणार आयपीएल मिनी लिलाव?
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव अबू धाबी येथे होणार असून तो एकाच दिवसात पूर्ण केला जाईल. भारतीय वेळेनुसार लिलावाची सुरुवात दुपारी 2:30 वाजता होणार आहे. मिनी लिलाव असल्यामुळे यावेळी संघांना राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची मुभा दिली जाणार नाही.
किती खेळाडू लिलावात असतील?
या मिनी लिलावासाठी एकूण 359 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, सर्व आयपीएल संघ मिळून फक्त 77 खेळाडू खरेदी करू शकतील. यामध्ये 31 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 40 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावासाठी नाव नोंदवले आहे. यात भारतीय खेळाडू वेंकटेश अय्यर आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश आहे.
हेही वाचा – IPL 2026: नाशिकचे दोन खेळाडू आयपीएलमध्ये! एकाची CSKमध्ये निवड, तर दुसरा कोणत्या संघात जाणार?
संघात किती खेळाडूंना परवानगी?
आयपीएलच्या नियमानुसार, प्रत्येक संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. तसेच, एका संघात कमाल 8 परदेशी खेळाडू ठेवता येतात, मात्र त्यापैकी फक्त 4 खेळाडूंनाच अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची परवानगी असते.
हेही वाचा – IND vs UAE: वैभव सुर्यवंशीच्या शतकाने भारताची धडाकेबाज सुरुवात; UAE वर 234 धावांनी दणदणीत विजय
कोणत्या संघाकडे सर्वाधिक पर्स आहे?
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाकडे सर्वाधिक रक्कम उपलब्ध आहे. केकेआरकडे तब्बल 64.30 कोटी शिल्लक आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडे 43.40 कोटी उपलब्ध आहेत. तर मुंबई इंडियन्स (MI) कडे लिलावासाठी सर्वात कमी रक्कम असून त्यांची पर्स 27.5 कोटी इतकी आहे. दरम्यान आता 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या या मिनी लिलावात कोणते खेळाडू कोणत्या संघात सामील होतात आणि कोणता संघ आपला स्क्वॉड सर्वाधिक मजबूत करण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.