सर्वांचे लाडके दैवत श्री गणरायाचे आगमन आज गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात होत आहे. मात्र, बाप्पाला दररोज गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो. त्यात उकडीचे मोदक हे सर्रास बनवले जातात. मात्र त्यातही आता विविध प्रकार प्रचलित झाले आहेत. आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकरता खास गोडाचा नैवेद्य पाहणार आहोत. मोदकाचे उकडीचे, तळणीचे, खव्याचे आणि ड्रायफ्रूट्सचे असे अनेक स्वादिष्ट आणि लोकप्रिय प्रकार आहेत.
उकडीचे मोदक : हा बाप्पाचा अत्यंत आवडता आणि महाराष्ट्रातील सर्वात पारंपरिक प्रकार आहे. तांदळाच्या उकडलेल्या पिठात खोबरे आणि गुळाचे सारण भरून हे मोदक वाफेवर शिजवले जातात.
तळणीचे मोदक : याचे आवरण कणिक किंवा मैद्यापासून बनवले जाते. आतमध्ये खोबरे आणि गुळाचे सारण भरून हे मोदक खमंग तळले जातात.
खव्याचे मोदक : खवा (मावा), साखर आणि वेलची पूड एकत्र करून हे मोदक बनवले जातात. हे दिसायला अतिशय सुंदर आणि चवीला गोड असतात.
रवा मोदक : रवा, किसलेले खोबरे आणि गूळ एकत्र परतून हे झटपट मोदक तयार केले जातात.
ड्रायफ्रूट मोदक : काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि खजूर मिक्स करून हे आरोग्यदायी मोदक बनवले जातात. यात साखर किंवा पिठाचा वापर केला जात नाही.
चॉकलेट मोदक : हा एक आधुनिक (फ्युजन) प्रकार आहे. चॉकलेट आणि ड्रायफ्रूट्स वापरून बनवलेले हे मोदक लहान मुलांना खूप आवडतात.