Earthquake in India: ईशान्य भारतातील सिक्कीम राज्याला शुक्रवारी पहाटे भूकंपाचे दोन सलग धक्के बसले. 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी'ने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, गंगटोक आणि आसपासच्या परिसरात हे धक्के जाणवले. सुदैवाने, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची नोंद झालेली नाही. मात्र, पहाटेच्या वेळी जमिनीला बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक प्रचंड घाबरले असून अनेकजण सुरक्षिततेसाठी घराबाहेर धावत आले.
पहाटे 4:26 वाजता बसला पहिला धक्का
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार, पहिला भूकंप पहाटे 4:26 वाजता झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गंगटोकच्या वायव्येस सुमारे 10.7 किलोमीटर अंतरावर, जमिनीखाली केवळ 5 किलोमीटर इतक्या उथळ खोलीवर होता. त्यानंतर लगेचच बसलेल्या दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल इतकी होती. हा दुसरा धक्का शहराच्या पश्चिमेस 11.2 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर झाला.
भूकंप का होतात? काय आहे शास्त्रीय कारण?
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सात मुख्य 'टेक्टोनिक प्लेट्स' (भूगर्भीय पट्ट्या) असतात, ज्या सतत हालचाल करत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा भूकंपाच्या स्वरूपात बाहेर पडते. हिमालयीन प्रदेशात 'भारतीय टेक्टोनिक प्लेट' ही 'युरेशियन प्लेट'वर सतत आदळत असल्याने सिक्कीमसारख्या राज्यांमध्ये भूकंपाचा धोका सर्वाधिक असतो.
भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (Earthquake Zones)
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भारताचा सुमारे 59 टक्के भूभाग भूकंपाच्या छायेत आहे. शास्त्रज्ञांनी याचे चार विभागांत वर्गीकरण केले आहे:
झोन 5: सर्वाधिक सक्रिय आणि उच्च धोका असलेले क्षेत्र (उदा. हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत).
झोन 4: संवेदनशील क्षेत्र, ज्यामध्ये राजधानी दिल्लीचा समावेश होतो. येथे 7 पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याचा धोका असतो.
झोन 3 आणि 2: मध्यम ते कमी सक्रिय मानले जाणारे भाग.
रिश्टर स्केलवरील तीव्रतेचे परिणाम
4.0 – 4.9: घरातील हलक्या वस्तू खाली पडू शकतात.
5.0 – 5.9: जड फर्निचर हलू शकते.
6.0 – 6.9: इमारतींच्या पायाला तडे जाऊ शकतात.
7.0 – 7.9: इमारती कोसळून मोठा विनाश होऊ शकतो.
8.0 पेक्षा जास्त: त्सुनामीचा धोका आणि अत्यंत विनाशकारी परिस्थिती ओढवू शकते.