CBSE 12th Revaluation: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) कडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या गुणांबाबत असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उत्तरपत्रिकांची पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्यासाठी अर्ज भरण्याची आज अंतिम संधी आहे. इच्छुक उमेदवार आज मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2026 ही निश्चित करण्यात आली होती, मात्र विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता बोर्डाने यामध्ये 1 दिवसाची वाढ केली आहे.
तांत्रिक अडचणी आणि सायबर हल्ल्यांमुळे घेतला निर्णय
मूळ मुदतीदरम्यान निकालांनंतरच्या सेवा हाताळणाऱ्या अधिकृत बोर्डाच्या पोर्टलवर सतत तांत्रिक बिघाड होत होते. तसेच या मुख्य पोर्टलवर काही सायबर हल्ले झाल्याचेही समोर आले होते. या सर्व तांत्रिक समस्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी CBSE प्रशासनाने अखेरच्या क्षणी डिजिटल पोर्टलची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.
निकालानंतर 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज
अनेक विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात त्रुटी असल्याचा किंवा गुण मोजणीत चूक झाल्याचा संशय आहे. अशा असंतुष्ट विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने तक्रार निवारण प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 4 June पर्यंत तब्बल 70,433 विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेत अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये गुणांच्या केवळ पडताळणीसाठी 7,314 अर्ज आले असून, संपूर्ण उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी तब्बल 63,199 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.
नवीन वेळापत्रक आणि अर्जाची वेळ
एकूण आलेले अर्ज: 70,433 (4 जूनपर्यंत)
गुण पडताळणी अर्ज: 7,314
पुनर्मूल्यांकन अर्ज: 63,199
नवीन अंतिम मुदत: विद्यार्थी आता 7 जून 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आपले अर्ज ऑनलाईन भरू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप काही कारणास्तव अर्ज केले नसतील, त्यांनी वेळेची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज तातडीने पूर्ण करावेत, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.