Monsoon Skin Infection Home Triggers : पावसाळा सुरू झाला की आपण सहसा बाहेरील साचलेले घाण पाणी व चिखलाला इन्फेक्शनसाठी कारणीभूत मानतो. पण खरा धोका तुमच्या घरातच दडलेला असतो. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे घरात रोज वापरले जाणारे टॉवेल, बेडशीट, सोफ्याचे कुशन आणि दारासमोरील पायपुसणी फंगल इन्फेक्शन व स्किन ॲलर्जीचे मुख्य कारण बनतात. हवेतील गारवा आणि भिंतीवरील ओलावा यांमुळे घरातील वस्तूंमध्ये बुरशी व आजार निर्माण करणारे जीवाणू अतिशय वेगाने वाढतात. यामुळे त्वचेवर अचानक खाज सुटणे किंवा लाल चट्टे दिसू लागतात.
बुरशी वाढण्याचे तांत्रिक कारण आणि कोणाला असतो सर्वाधिक धोका?
फंगस म्हणजेच बुरशी वाढण्यासाठी सर्वात जास्त गरज ओलाव्याची असते. तर, जीवाणूजन्य रोग ओलाव्यासह सुमारे 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मिळाले वेगाने पसरतात. कारण त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. मान्सूनमध्ये नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाल्याने संसर्ग वेगाने पसरतो. काही विशिष्ट लोकांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.
– मधुमेह रुग्ण: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांच्यासाठी हे बुरशीजन्य आजार मोठी समस्या ठरू शकते.
– वृद्ध अन् लहान मुले: यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने ते फंगल (बुरशीजन्य संसर्ग) आणि बॅक्टेरियल (जीवाणूजन्य संसर्ग) इन्फेक्शनच्या विळख्यात लवकर सापडतात, त्यामुळे त्यांना बरे होण्यासही जास्त वेळ लागतो.
त्वचा संसर्गाची सुरुवातीची लक्षणे आणि दुर्लक्षित करण्याजोगे संकेत
पावसाळ्यात त्वचेवर खालील लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी न घेतल्यास हा त्रास संपूर्ण शरीरावर पसरू शकतो.
– त्वचेवर सतत तीव्र खाज सुटणे आणि त्वचा लाल होऊन त्यावर चट्टे पडणे.
– गोलाकार आकाराचे दाणे किंवा रॅशेस होणे तसेच त्वचा सोलवटणे.
– इन्फेक्शन असलेल्या त्वचेतून दुर्गंधी येणे.
– पायाच्या बोटांच्या फटींमध्ये पांढरी किंवा ओली त्वचा होणे, ज्याला सामान्य भाषेत चिखल्या होणे म्हणतात.
घरातील या 4 मुख्य गोष्टी ठरू शकतात संसर्गाचे कारण
कपाटातील सुती कपडे ओलावा लवकर शोषून घेतात, त्यामुळे कपाटातून कुबट वास येत असल्यास त्यात बुरशी तयार झाल्याचे समजावे. म्हणूनच या ऋतूत कपडे व्यवस्थित इस्त्री करून अथवा पूर्णपणे सुकवूनच कपाटात ठेवावेत. ओला टॉवेल, ओले मोजे किंवा अंडरगार्मेंट्स जास्त वेळ वापरणे किंवा ते सुक्या कपड्यांसोबत एकत्र ठेवणे ही मोठी चूक ठरू शकते, कारण एका कपड्यामुळे कपाटातील सर्व कपड्यांमध्ये हळूहळू बुरशी पसरू शकते. कपड्यांमधील मॉइश्चर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कपाटात काही वेळ बल्ब पेटवून ठेवू शकता. यासोबतच बाथ मॅट, उशीचे कव्हर आणि बेडशीट या गोष्टी दीर्घकाळ दमट राहिल्यास बुरशी वेगाने वाढते, म्हणून त्या वेळोवेळी धुणे गरजेचे आहे.
अस्वच्छ भांडी, पोटाचे विकार आणि स्टेरॉइड क्रीम वापरण्याचा धोका
घरात केवळ कपड्यांमुळेच नव्हे तर अस्वच्छ भांडी, दीर्घकाळ उघडे राहिलेले पाणी व शिळे अन्न यामुळेही बॅक्टेरिया वेगाने वाढतात. पावसाळ्यात अशा दूषित अन्नाचे सेवन केल्यास फूड पॉयझनिंग, पोटाचे विकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. दुसरीकडे, पावात भिजल्यानंतर खाज किंवा रॅशेस आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याशिवाय मेडिकलमधून आणून कोणतीही स्टेरॉइड क्रीम लावू नका. यामुळे फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) तात्पुरते दबले तरी नंतर ते अधिक गंभीर रूप धारण करते. त्रास कायम राहिल्यास त्वरित डर्मेटोलॉजिस्टशी (त्वचारोगतज्ज्ञ) संपर्क साधावा.
संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी 5 सोपे उपाय
पावसाळ्यात त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खालील 5 महत्त्वाच्या गोष्टी पाळणे महत्त्वाचे आहे –
– पावसात भिजल्यानंतर उशीर न करता लगेचच सुके व स्वच्छ कपडे परिधान करा.
– त्वचा, विशेषतः त्वचेच्या घड्या व पायाची बोटे नेहमी पूर्णपणे सुकी ठेवा.
– ओले टॉवेल, मोजे व अंडरगार्मेंट्स चुकूनही पुन्हा वापरू नका.
– नेहमी ताजे घरगुती अन्न अन् शुद्ध पाण्याचे सेवन करा; तसेच जास्त गोड किंवा प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)