राज्यात गेल्या दोन महिन्यापासून विलिगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. मात्र विलिनीकरण डोक्यातून काढून टाकण्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच कामावर पुन्हा रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
एसटी कर्माचाऱ्यांबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी असल्याची टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षेचा प्रश्न आणि नागपूरमध्ये दहशतवाद्यांची रेकी या प्रकरणावरूनही गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
राज्यातील एसटी बससेवा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. तसेच राज्यातील पेपरफुटी प्रकरण, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत आहे. राज्यातील असे सर्व घटक महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत अक्षम्य चूक होणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाचे पंतप्रधान ज्यावेळी एखाद्या राज्यात जातात ते देशाचे असतात. मात्र पंजाबमधील या प्रकरणानंतर काँग्रेस नेत्यांनी बोलायला जागा ठेवली नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.