मुंबई : महाराष्ट्रातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांना जगासमोर आणण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ या नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेत पर्यटकांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या छायाचित्रकाराला तब्बल 5 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल.
योजनेचा उद्देश आणि फायदा
या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध जाहिरात आणि प्रचार मोहिमांमध्ये वापरली जातील. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे होईल. ही स्पर्धा केवळ व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी नसून, हौशी फोटोग्राफर्सनाही यामध्ये सहभागी होता येईल. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य, संस्कृती आणि समृद्ध वारसा छायाचित्रांच्या माध्यमातून जगासमोर मांडणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचे निकष आणि बक्षिसे
फोटो अपलोड करण्याचे ठिकाण: तुम्हाला तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांचे फोटो एमटीडीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत.
निवडीचा आधार: पर्यटन आणि छायाचित्रण क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक विशेष मंडळ फोटोंची गुणवत्ता, विषयाची निवड आणि कलात्मकता यावर निवड करेल.
बक्षिसे :
– प्रथम विजेता: 5 लाख रुपये
– प्रथम उपविजेता: 1 लाख रुपये
– द्वितीय उपविजेता: 75 हजार रुपये
– पाच उत्तेजनार्थ पारितोषिके: प्रत्येकी 50 हजार रुपये
इतर विशेष पुरस्कार
‘फोटो ऑफ दि डे’ आणि ‘फोटो ऑफ दि मंथ’: यांची निवड समाजमाध्यमांवरील (सोशल मीडिया) मतदानावर आधारित असेल.
विनामूल्य रिसॉर्ट स्टे: ‘फोटो ऑफ दि मंथ’ विजेत्यांना दोन व्यक्तींसाठी तीन दिवस, दोन रात्री एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहण्याची संधी मिळेल.
फोटो गॅलरी: निवडक छायाचित्रांची माहिती डिजिटल फोटो गॅलरीमध्ये प्रदर्शित केली जाईल.
एमटीडीसीतर्फे पर्यटकांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "हा अतिशय चांगला उपक्रम आहे. पर्यटकांनी यामध्ये सहभागी होऊन भेट दिलेल्या पर्यटनस्थळांचे छायाचित्र एमटीडीसीच्या संकेतस्थळावर अपलोड करावे आणि बक्षिसे जिंकावी," असे एमटीडीसीचे वरिष्ठ प्रबंधक दिनेश कांबळे म्हणाले.