Unlimited Thali Hacks : हल्ली हॉटेलमध्ये गेल्यावर 'अनलिमिटेड थाळी' हा शब्द ऐकला की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. कुणी झणझणीत गावरान चिकन थाळीची ऑर्डर देतं, तर कुणी चमचमीत मिसळ किंवा चायनीज पदार्थांची. अनेक हॉटेल्समध्ये तर थेट लग्नाच्या बुफेसारखी 20 ते 30 पदार्थांची मांडणी केलेली असते. कमी पैशात पोटभर आणि मनासारखं खायला मिळेल या आशेनं आपण जातो खरं.. पण प्रत्यक्षात दोन-चार घास खाल्ले की पोट फुगतं आणि 'पैसा वसूल' झाला नाही, अशी रुखरुख मनाला लागते.
तर अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो, की या अनलिमिटेड थाळीतल्या राजभोगांचा 'पैसा वसूल आस्वाद' घ्यायचा कसा? मेन्यू कार्ड वाचल्यानंतर सपाटून भूक लागलेली असते.. पण थाळी समोर आल्यानंतर हे खाऊ की ते खाऊ अशा संभ्रमित अवस्थेमध्ये आणि त्यातच वाढपी येऊन हे वाढू का.. ते वाढू का विचारत असल्यामुळे जास्तच गोंधळ उडतो. शेवटी, पोट भरल्यानंतरही अजून काहीतरी खायचं राहूनच गेलं अशी भावना तयार होते आणि काही जण तर पुढच्या खेपेला हॉटेलमध्ये गेल्यावर अशी भरभरून भरलेली थाळी पुन्हा ऑर्डर करायलाही कचरतात..
थाळीसमोर बसण्यापूर्वी 'असा' करा प्लॅन
– अनलिमिटेड जेवणात यशस्वी व्हायचं असेल, तर सर्वात आधी समोर असलेल्या मेन्यू कार्डावर नजर टाका.
– थाळीत कोणते पदार्थ आहेत हे नीट समजून घेतल्यावर तुमच्या आवडीच्या पदार्थांचे आधीच नियोजन करा.
– ताटात एकाच वेळी ढीगभर पदार्थ वाढून घेऊ नका, कारण ताट भरलेलं पाहिलं की मानसशास्त्रीयदृष्ट्या भूक लवकर मरते. त्याऐवजी मोजकेच पण खास पदार्थ निवडा, जेणेकरून तुम्ही थकवा न जाणवता जास्त वेळ जेवणाचा आनंद घेऊ शकाल.
– तसेच, वाढप्याला बोलावल्यानंतरच येण्यास सांगा.
'या' पदार्थांना करा 'टाटा' अन् 'या' पदार्थांवर मारा ताव
– जर तुम्हाला पैशांची खरी वसुली करायची असेल, तर चपाती, भाकरी, साधा भात किंवा रस्सा भाजी यांसारख्या रोजच्या पदार्थांकडे शक्यतो दुर्लक्ष करा. हे पदार्थ पोट लवकर भरतात आणि आपण घरीही खाऊ शकतो. हे अगदी कमीच वाढून घ्या किंवा अन्नाची नासाडी टाळण्यासाठी घेऊच नका..
– त्याऐवजी थाळीत असलेल्या चविष्ट स्टार्टर्सवर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, दहीवडा, चविष्ट चाट, अळुवडी, बटाटे वडे किंवा खमंग भजी अशा फरसाणच्या प्रकारांना प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेता येईल आणि पोटही लगेच गच्च होणार नाही.
हेही वाचा – Gajar Halwa Recipe: गाजर किसायची कटकट संपली! न किसता बनवा मऊ आणि स्वादिष्ट गाजरचा हलवा
शांतपणे खाण्याचं कौशल्य आणि गोडाचा आस्वाद
– जेवताना कधीही घाई करू नका. संपवण्याचं टेन्शन न घेता आरामात खा. घाईघाईत खाल्ल्याने लवकर पोट भरते आणि ताटावरून उठून गेल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा भूक लागल्यासारखे वाटते.
– कोणी आपल्याला पाहत आहे का, या विचाराने काही जण कमी जेवतात. हॉटेलमध्ये अनलिमिटेड थाळी जेवताना हा विचार मुळीच करू नका.
– प्रत्येक पदार्थाचा स्वाद घेत जेवा. थाळीतले गोड पदार्थ जसे की आम्रखंड, गुलाबजाम किंवा श्रीखंड शेवटी खाण्यापेक्षा मधून मधून चाखले तरी चालतील; कारण गोड पदार्थ नवीन चवीसाठी तुमची जीभ पुन्हा तयार करतात.
– सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शक्यतो ही अनलिमिटेड थाळी दुपारच्या जेवणाला साधारण 12 ते 1 वाजताच्या दरम्यान खा. रात्री अनलिमिटेड आणि पचायला जड पदार्थ खाल्ल्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. यामुळे अनलिमिटेड थाळीचा आपल्याला मिळालेला आनंद काही काळात विरतो.
टेन्शन सोडा आणि जेवणाचा आनंद घ्या
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'एखादा पदार्थ सुटेल की काय' याचं दडपण मनावर घेऊ नका. जर तुम्ही टेन्शन घेऊन खाल्लं, तर अन्नाचा आनंद घेता येत नाही. अनलिमिटेड थाळी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा नाही, तर तो एक सुंदर अनुभव आहे. शांतपणे, मोजक्या पण आवडीच्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करून जेवलात, तरच तुमचे 500 किंवा 1000 रुपये सार्थकी लागतील. लक्षात ठेवा, समाधानाने ढेकर देऊन हॉटेलबाहेर पडणं हीच खरी 'पैसा वसूल' थाळी!
हेही वाचा – World's Most Expensive Fruit: अॅव्होकॅडो किंवा ब्लूबेरी नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महागडं फळ