Karnataka Congress Crisis: कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चेला आता स्वतः पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील सत्तावाटपावरून निर्माण झालेल्या तणावाची कबुली देत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि इतर वरिष्ठ नेत्यांना पुढील काही दिवसांत दिल्लीला चर्चेसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर काँग्रेस हायकमांडने प्रथमच स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे या राजकीय पेचाला समाधानाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हायकमांडकडून निर्णायक बैठक
माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, “कर्नाटकातील परिस्थितीवर आम्ही हायकमांडमध्ये सामूहिक चर्चा करणार आहोत. मी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी आम्ही सर्वजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ.” या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने अधिकृतरीत्या राज्यातील अस्थिरतेची कबुली दिली आहे.
राहुल गांधींच्या सूचनेनंतर मंगळवारी डी.के. शिवकुमार यांनी आपल्या राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. त्यानंतर खरगे तातडीने बेंगळुरूला रवाना झाले आणि राहुल गांधींशी जवळपास 25 मिनिटांची चर्चा केली. दिल्लीतील आगामी बैठक सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.
हेही वाचा – Property Stamp Duty: महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदीत घट; सवलत असूनही पुरुषांचा विश्वास कमी?
कर्नाटकातील मतभेदावर भाजपची टीका
काँग्रेसमधील कुरघोड्यांवर भाजप सतत निशाणा साधत आहे. सोशल मीडियावरूनही भाजपने टीकास्त्रांचा भडिमार केला. मात्र काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी या आरोपांना विरोध केला. ते म्हणाले, “कर्नाटक सरकार अस्थिर करण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. हा भाजपचा नियोजित प्रचार आहे.”