Multibagger Stock: सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजारात चिंतेचे वातावरण असून सलग 3 दिवस घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, अशाही अस्थिर स्थितीत महाराष्ट्रातील एका नामांकित मायनिंग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. 'लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी' (Lloyds Metals and Energy) या कंपनीचा शेअर अवघ्या 5 वर्षांत 11 रुपयांवरून 1200 रुपयांच्या पुढे गेल्याने सध्या मार्केटमध्ये या स्टॉकचीच चर्चा रंगली आहे.
लॉयड्स मेटल्सचा ऐतिहासिक 'मल्टीबॅगर' परतावा
लॉयड्स मेटल्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरला आहे. या कंपनीच्या प्रगतीचा आलेख थक्क करणारा आहे. मार्च 2021 मध्ये या शेअरची किंमत अवघी 11 रुपये होती, जी आता 1205 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 10,854 टक्के इतका अवाढव्य परतावा दिला आहे. गणिताच्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने मार्च 2021 मध्ये या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही मिळाला मोठा लाभ
विशेष म्हणजे, या कंपनीत केवळ मोठे संस्थात्मक गुंतवणूकदारच नाहीत, तर सर्वसामान्यांचाही मोठा वाटा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये सुमारे 32.5 टक्के भागीदारी ही रिटेल (लहान) गुंतवणूकदारांची आहे. याचाच अर्थ, या स्टॉकच्या ऐतिहासिक तेजीचा खरा आर्थिक लाभ महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
हेही वाचा – Rupee Vs Dollar: ‘सबसे बडा रुपैया’ म्हणायचं तरी कसं? रुपयाची आज ऐतिहासिक घसरण
शेअरची सध्याची स्थिती आणि नफावसुली
या शेअरने मे 2024 ते जुलै 2025 या काळात 1643.40 रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. बुधवारी (12 मार्च) हा शेअर 1205.60 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, आज शुक्रवारी (13 मार्च) बाजार उघडताच जागतिक बाजारातील संकेतांमुळे त्यात काहीशी नफावसुली (Profit Booking) पाहायला मिळाली. सुमारे 58 रुपयांच्या घसरणीसह सध्या हा शेअर 1147.60 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. बाजार सावरल्यानंतर हा शेअर पुन्हा उसळी घेणार का, याकडे आता तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.