India Sri Lanka UPI Payment Expansion for Tourists : श्रीलंका फिरायला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी आता प्रवासाचा आनंद द्विगुणित होणार आहे. श्रीलंकेतील हॉटेल, दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये आता UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) पेमेंट स्वीकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना आता रोख रक्कम किंवा विदेशी चलन (Foreign Currency) सोबत बाळगण्याची चिंता उरणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आता श्रीलंकेत UPI चा विस्तार करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे, जेणेकरून भारतीयांना तेथे आपल्या देशात असल्यासारखाच पेमेंट अनुभव मिळेल.
कुठे आणि कसे करता येईल पेमेंट?
श्रीलंकेत आधीपासूनच LankaQR द्वारे UPI पेमेंटची सुविधा उपलब्ध होती, परंतु आता तिचा विस्तार सुपरमार्केट, रिटेल दुकाने आणि मोठ्या हॉटेल साखळींपर्यंत करण्यात आला आहे. भारतीय प्रवासी आपल्या मोबाईलमधील UPI ॲपद्वारे थेट QR कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतील. विशेष म्हणजे, हे पैसे थेट तुमच्या भारतीय बँक खात्यातून कापले जातील आणि व्यवहाराच्या वेळी तुम्हाला तात्काळ एक्सचेंज रेट (चलन विनिमय दर) देखील स्पष्टपणे पाहायला मिळेल. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.
हेही वाचा – WhatsApp Guest Chats: आता ॲप डाऊनलोड न करताही करता व्हॉट्सॲपवर चॅट, काय आहे नवीन फिचर?
भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ
श्रीलंकेला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, वर्ष 2025 मध्ये 5.31 लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली, जी संख्या 2024 च्या तुलनेत खूप जास्त आहे. श्रीलंकेच्या पर्यटनामध्ये भारतीयांचा वाटा मोठा असल्याने, तिथल्या सरकारने आणि बँकिंग क्षेत्रातील संस्थांनी डिजिटल पेमेंट सुविधांना प्राधान्य दिले आहे. यामुळे पर्यटकांना चलन बदलण्यासाठी (Currency Exchange) रांगेत उभे राहण्याची किंवा जादा कमिशन देण्याची गरज भासणार नाही.
व्यवहार सुलभता आणि सुरक्षितता
डिजिटल इंडियाचा हा विस्तार आता सीमा ओलांडून शेजारील देशांमध्येही पाय रोवत आहे. श्रीलंकेत UPI वाढल्यामुळे केवळ पर्यटकांनाच नाही, तर तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनाही फायदा होत आहे. व्यवहार सुरक्षित असल्याने आणि पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने पारदर्शकता वाढली आहे. आगामी काळात श्रीलंकेतील छोट्या टॅक्सी चालकांपासून ते मोठ्या रिसॉर्ट्सपर्यंत सर्वत्र UPI अनिवार्य करण्याचे नियोजन आहे. यामुळे भारतीय पर्यटकांचा परदेशातील खर्च करण्याचा अनुभव अधिक सुसह्य आणि आधुनिक होणार आहे.
हेही वाचा – Elon Musk Super App : एलॉन मस्क यांचे आता येणार सुपर ॲप, असणार या खास सुविधा