IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (DC) संघात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ज्या खेळाडूचे नाव कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे, त्याचा पगार अक्षरपेक्षा सुमारे 2.5 कोटी रुपयांनी कमी असूनही त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेलला कर्णधार पदावरून का हटवले?
IPL 2025 च्या हंगामात अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 14 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले होते. कामगिरी समाधानकारक असली तरी, संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे आगामी हंगामात जेतेपदावर नाव कोरण्यासाठी संघ व्यवस्थापन नवीन रणनीती आणि नवीन नेतृत्वाचा विचार करत आहे. अक्षर हा संघाचा मुख्य खेळाडू राहील, मात्र त्याच्यावरचा नेतृत्वाचा भार कमी केला जाणार आहे.
केएल राहुलकडे सूत्रे जाण्याची शक्यता
दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलचे नाव सध्या चर्चेत आहे. राहुलकडे पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या संघांचे नेतृत्व करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. संघात नवीन ऊर्जा भरण्यासाठी आणि फलंदाजीसोबतच नेतृत्वात परिपक्वता आणण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स राहुलची नियुक्ती करू शकते. जरी अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरी, राहुल ही फ्रँचायझीची पहिली पसंती असल्याचे समजते.
अक्षरला टीम इंडियात मोठी लॉटरी
एककीकडे आयपीएलमध्ये कर्णधारपद जाण्याची चर्चा असली तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर अक्षर पटेलचा दबदबा वाढला आहे. BCCI ने आगामी ICC T20 विश्वचषक 2026 साठी शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलची 'उपकर्णधार' म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला मिळाले असून, टीम इंडियाच्या निवड समितीने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.