Kitchen Sponge Bacteria: स्वयंपाकघरातील भांडी चकचकीत करण्यासाठी आपण ज्या स्पंजचा वापर करतो, तोच स्पंज तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा धोका ठरू शकतो. एप्रिल 2026 मध्ये Environmental Advances या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार, स्पंज केवळ जिवाणूंचे माहेरघर नसून तो सूक्ष्म प्लास्टिक कणांच्या (Microplastics) निर्मितीचा मोठा स्रोत असल्याचे समोर आले आहे. आपण स्पंजचा वापर कसा करतो आणि तो किती काळ वापरतो, यावर आपली सुरक्षा अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षी अनेक टन मायक्रोप्लास्टिक्सची निर्मिती
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 'SpongeBob' नावाच्या यंत्राचा वापर करून प्रयोगशाळेत भांडी घासण्याच्या प्रक्रियेची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. यातून असे दिसून आले की, भांडी घासताना स्पंजची होणारी झीज पर्यावरणासाठी घातक आहे. एका व्यक्तीकडून दरवर्षी साधारणपणे 0.68 ते 4.21 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक्स केवळ स्पंजद्वारे उत्सर्जित होतात. जागतिक स्तरावर ही एकत्रित मात्रा दरवर्षी अनेक टन इतकी प्रचंड भरते. विशेष म्हणजे, जितक्या जोरात किंवा आक्रमकपणे स्पंजने भांडी घासली जातात, तितक्या जास्त प्रमाणात त्यातून हे घातक कण बाहेर पडतात.
जिवाणूंची वाढ आणि अन्न विषबाधेचा धोका
पर्यावरण तज्ज्ञ प्रीती महेश बांदिया आणि CSE च्या अनुमिता रॉयचौधरी यांच्या मते, ओला स्पंज हा जिवाणूंच्या वाढीसाठी सर्वात पोषक माध्यम (Breeding Ground) आहे. जर एकाच स्पंजचा वापर दीर्घकाळ केला, तर त्यामध्ये धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे 'फूड पॉयझनिंग'चा (अन्न विषबाधा) गंभीर धोका निर्माण होतो. ओलावा आणि अन्नाचे सूक्ष्म कण स्पंजमध्ये अडकून राहिल्याने सूक्ष्मजीवांची उत्पत्ती वेगाने होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने दर 7 ते 15 दिवसांनी स्पंज बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
निर्जंतुकीकरणाच्या प्रभावी पद्धती
संशोधकांनी स्पंज स्वच्छ करण्याच्या विविध पद्धतींवरही प्रकाश टाकला आहे. अभ्यासानुसार, ओले स्पंज केवळ 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यातील 99.99999 टक्के जिवाणू नष्ट होतात. तसेच, डिशवॉशरमध्ये 'ड्राय सायकल'चा वापर केल्यास 99.9998 टक्के जिवाणूंचा नायनाट होतो. याउलट, लिंबूपाणी, साधे पाणी किंवा ब्लीचचा वापर जिवाणू मारण्यासाठी तुलनेने कमी प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
हेही वाचा – Sugarcane Juice: सावधान! ऊसाचा रस पिताय? 'या' गंभीर समस्या असतील तर चुकूनही पिऊ नका, फायद्याऐवजी होईल त्रास
स्पंजला सुरक्षित पर्याय काय?
पारंपारिक स्पंजला फाटा देऊन आधुनिक आणि सुरक्षित पर्यायांकडे वळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे:
सिलिकॉन डिश ब्रश: याची पृष्ठभाग गुळगुळीत असल्याने त्यावर जिवाणू टिकत नाहीत आणि ते स्वच्छ करणे सोपे असते.
सिलिकॉन हातमोजे: भांडी घासण्यासाठी सिलिकॉन हातमोजे वापरल्याने त्वचेचे संरक्षण होते आणि स्वच्छताही सखोल होते.
डिशवॉशर: भांडी केवळ स्वच्छच करत नाही, तर उच्च तापमानामुळे ती पूर्णपणे निर्जंतुक होतात.
आपल्या दैनंदिन सवयींमधील हा छोटासा बदल केवळ आपले आरोग्यच नव्हे, तर पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासही मदत करू शकतो.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.