FSSAI Notice: देशभरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (FSSAI) ने कडक पावले उचलली आहेत. उत्पादनांमध्ये अळ्या सापडणे, अन्नातील भेसळ आणि आउटलेट्समधील अस्वच्छता यांसारख्या गंभीर आरोपांवरून FSSAI ने देशातील प्रमुख नामांकित कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सोशल मीडियावर ग्राहकांनी फोटोंसह तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर, नियामक संस्थेने या प्रकरणांची स्वतःहून (suo motu) दखल घेत ही कारवाई केली आहे.
मॅगीच्या पाकिटात कीटक; नेस्ले इंडियाकडून मागवला 'ATR'
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मॅगीच्या पाकिटात अळ्या आणि कीटक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत FSSAI ने 'नेस्ले इंडिया'ला (Nestle India) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच कंपनीकडून यावर सविस्तर 'कृती अहवाल' (Action Taken Report – ATR) मागवला आहे. दूषित अन्नपदार्थांचा तो संबंधित साठा पुरवठा साखळीतून (supply chain) तात्काळ कसा बाजूला केला, उत्पादनाची अंतर्गत तपासणी कशी झाली आणि संबंधित विक्रेत्याची माहिती काय, याचा सविस्तर तपशील या अहवालात देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
KFC आउटलेटमध्ये अस्वच्छतेचा कळस
दुसऱ्या एका प्रकरणात आंध्र प्रदेशातील एलुरू येथील MVR मॉलमध्ये असलेल्या प्रसिद्ध 'KFC' आउटलेटमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. FSSAI ने या आउटलेटला नोटीस धाडून अन्न हाताळणी, कचरा व्यवस्थापन, आउटलेटचे निर्जंतुकीकरण आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता यांमधील गंभीर त्रुटींवर कडक शब्दांत स्पष्टीकरण मागवले आहे. दरम्यान, KFC चे कामकाज सांभाळणाऱ्या 'देवयानी इंटरनॅशनल'ने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करून FSSAI समोर आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
'फ्लिपकार्ट मिनिट्स' देखील रडारवर
दरम्यान, अळ्या आढळल्याचे तिसरे प्रकरण 'ओपन सिक्रेट' (Open Secret) या ब्रँडच्या 'अन-जंकड' खजुराच्या पाकिटाशी संबंधित आहे. 'फ्लिपकार्ट मिनिट्स' या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मागवलेल्या खजुराच्या पाकिटात अळ्या निघाल्याची तक्रार एका ग्राहकाने सोशल मीडियावर केली होती. याप्रकरणी FSSAI ने कंपनीकडून त्यांच्या अंतर्गत गुणवत्ता-नियंत्रण प्रणालीच्या नोंदी मागवल्या असून, भविष्यात अशा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.