LPG Cylinder New Rule: तुम्ही घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) गॅस कनेक्शनशी संबंधित नियमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता कोणत्याही ग्राहकाला एकाच पत्त्यावर किंवा एकाच घरात LPG आणि PNG अशी दोन्ही गॅस कनेक्शन्स एकत्र ठेवता येणार नाहीत. ज्या ग्राहकांकडे दोन्ही कनेक्शन्स आहेत, त्यांना आता एका कनेक्शनवर पाणी सोडावे लागणार आहे.
नवीन नियमांनुसार 30 दिवसांची मुदत; अन्यथा कनेक्शन होणार रद्द
नवीन सरकारी आदेशानुसार, ज्या भागात पीएनजी (पाईप गॅस) पुरवठा सुरू झाला आहे आणि ज्या नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घेतले आहे, त्यांना त्यांचे सध्याचे एलपीजी कनेक्शन 30 दिवसांच्या आत गॅस कंपनीकडे परत (सरेन्डर) करणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने 1 जून रोजी नवीन PNG कनेक्शन घेतले असेल, तर त्याला 1 जुलैपर्यंत आपले जुने LPG कनेक्शन गॅस एजन्सीकडे जमा करावे लागेल. दिलेल्या मुदतीत हे काम न केल्यास ग्राहकाचे गॅस कनेक्शन थेट रद्द केले जाऊ शकते.
एलपीजी कनेक्शन परत केल्यावर मिळणार विशेष 'व्हाउचर'
नियम कडक करण्यात आले असले, तरी ग्राहकांसाठी यात एक दिलासादायक बाबही ठेवण्यात आली आहे. ग्राहकाने आपले एलपीजी कनेक्शन गॅस कंपनीकडे परत केल्यानंतर, त्याला कंपनीकडून एक 'LPG व्हाउचर' दिले जाईल. भविष्यात जर संबंधित ग्राहक अशा कोणत्याही भागात किंवा नवीन शहरात स्थलांतरित झाला, जिथे पीएनजी (PNG) गॅसची पाईपलाईन सुविधा उपलब्ध नाही; तर ते विशेष व्हाउचर दाखवून ग्राहक कोणत्याही त्रासाशिवाय आणि अतिरिक्त शुल्काशिवाय त्वरित नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकणार आहेत.
सिलेंडर बुकिंगचे नियमही कडक; शहरी आणि ग्रामीण भागासाठी मर्यादा
सरकारने केवळ कनेक्शन्सच्या नियमांमध्येच बदल केला नसून, सिलेंडर बुकिंगची प्रक्रियाही अधिक कडक केली आहे. नवीन नियमांनुसार, शहरी भागातील रहिवाशांना आता एका सिलेंडरनंतर दुसरे सिलेंडर बुक करण्यासाठी किमान 25 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजेच 25 दिवसांपूर्वी त्यांना दुसरे सिलेंडर बुक करता येणार नाही. दुसरीकडे, ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही मर्यादा अधिक असून, त्यांना दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 45 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
आव्हानात्मक परिस्थितीतही गॅस पुरवठा अखंड
केंद्र सरकारने 4 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात केवळ 3 दिवसांच्या कालावधीत तब्बल 1.43 कोटी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला असून, या काळात 1.5 कोटी नवीन बुकिंगची नोंद झाली आहे. पश्चिम आशियातील आव्हानात्मक आणि तणावपूर्ण परिस्थिती असूनही देशातील सर्व क्षेत्रांमध्ये गॅसचा पुरवठा अखंड आणि स्थिर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत उद्योग स्तरावर डिजिटल पेमेंट आणि पारदर्शकता वाढल्यामुळे ऑनलाइन एलपीजी सिलेंडर बुकिंगचे प्रमाण तब्बल 99 टक्क्यांवर पोहोचले आहे.