Vaibhav Suryavanshi: 16 सामन्यांत 776 धावा अन् ऑरेंज कॅप! IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशीला जाहिराती का मिळेना? मोठं कारण आलं समोर

राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना वैभव सूर्यवंशीने या हंगामात 16 सामन्यांत तब्बल 776 धावा कुटल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले.

Vaibhav Suryavanshi: 16 सामन्यांत 776 धावा अन् ऑरेंज कॅप! IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशीला जाहिराती का मिळेना? मोठं कारण आलं समोर

Vaibhav Suryavanshi: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विजेतेपद पटकावल्यानंतर आयपीएल (IPL) चा उत्साह आता शांत झाला असला, तरी एका खेळाडूची चर्चा अजूनही क्रिकेट जगतात रंगली आहे, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. या 15 वर्षीय युवा क्रिकेटपटूने आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने अशी काही कमाल केली, जी चाहते दीर्घकाळ विसरू शकणार नाहीत. मात्र, मैदानावरील या तुफानी कामगिरीनंतरही अनेक बड्या कंपन्या त्याला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यासाठी सध्या सावध भूमिका घेत आहेत.

उत्कृष्ट कामगिरीने वाढले 'ब्रँड व्हॅल्यू'
राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना वैभव सूर्यवंशीने या हंगामात 16 सामन्यांत तब्बल 776 धावा कुटल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला या हंगामातील 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर' (MVP) म्हणूनही गौरवण्यात आले. सध्या वैभवचा राजस्थान रॉयल्ससोबत 1.10 कोटी रुपयांचा वार्षिक करार आहे. या शानदार कामगिरीनंतर ब्रँड मार्केटमध्ये त्याची मागणी प्रचंड वाढली असून, त्याचे एका कराराचे शुल्क (Endorsement Fee) थेट 50 लाख रुपयांवरून वाढून 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

जाहिरातींच्या दुनियेत वैभवचे अस्तित्व मर्यादित का?
मैदानाबाहेर प्रचंड लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू वाढूनही वैभव खूपच कमी जाहिरातींमध्ये पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे अवघे 15 वर्षे असलेले वय. अल्पवयीन असल्यामुळे वैभवला काही कायदेशीर आणि व्यावहारिक मर्यादांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या आणि नामांकित लाइफस्टाइल ब्रँड्स सध्या त्याला करारबद्ध करण्यास कचरत आहेत.

कायदेशीर नियमांमुळे लाइफस्टाइल आणि फायनान्स ब्रँड्ससमोर मर्यादा
डिओडोरंट्स, मेन्स ग्रूमिंग उत्पादने, लक्झरी घड्याळे, आर्थिक क्षेत्र (फायनान्स) आणि फॅन्टसी ॲप्स यांसारखे ब्रँड्स प्रामुख्याने प्रौढ ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून जाहिराती करतात. 'एएससीआय' (ASCI – ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया) आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या कडक नियमांनुसार, हे ब्रँड्स कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीला त्यांच्या जाहिरात मोहिमेचा मुख्य चेहरा बनवू शकत नाहीत. क्रेडिट कार्ड आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील कंपन्याही याच नियमांमुळे सध्या वैभवपासून दूर राहणे पसंत करत आहेत.

हेही वाचा – Suryakumar Yadav Instagram Story: संघातून पत्ता कट झाल्यानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; इन्स्टाग्रामवर शेअर केली 11 शब्दांची स्टोरी

कुटुंब आणि राजस्थान रॉयल्सचा निर्णय
वैभवचे कुटुंब आणि राजस्थान रॉयल्सची व्यवस्थापन टीम त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीबाबत अत्यंत संतुलित धोरण अवलंबत आहे. ग्लॅमरच्या जगात वैभवचे क्रिकेटवरील लक्ष विचलित होऊ नये, म्हणून त्याला जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर ठेवले जात आहे. सध्या तो केवळ त्याच्या वयाला साजेसे ब्रँड्स, जसे की 'कॉम्प्लान' (Complan) आणि गुगल पेचे 'पॉकेट मनी' ॲप यांच्या जाहिरातींमध्येच दिसत आहे. सध्याच्या घडीला ब्रँड्स मोठ्या करारांऐवजी 2 ते 3 वर्षांच्या अल्पकालीन करारांना प्राधान्य देत असून, वैभवने टप्प्याटप्प्याने प्रगती करावी यावरच त्याच्या पाठीशी असलेल्या टीमचा भर आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number