Anurag Dwivedi ED Raid : उत्तर प्रदेशातील उन्नावच्या एका छोट्या गावातून आलेल्या 26 वर्षीय अनुराग द्विवेदी सध्या मोठ्या वादात सापडलe आहे. केवळ यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेली लोकप्रियता आणि अफाट संपत्ती यामुळे चर्चेत असलेला हा तरुण आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कचाट्यात अडकला असून, त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. एका साध्या आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील मुलगा अचानक करोडपती बनला आणि आलिशान जीवन जगू लागला ही बाब थक्क करणारी आहे.
शिक्षणात रस नव्हता; पण असा सुरू झाला पैशांचा ओघ
नवाबगंज येथील एका मेडिकल स्टोअर चालकाचा मुलगा असलेल्या अनुरागने केवळ 9 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. अभ्यासात मन लागत नसल्याने त्याने शाळा सोडली. पण क्रिकेट आणि 'फँटसी गेम्स'मध्ये त्याला कमालीची रुची होती. 2016 मध्ये त्याने पहिल्यांदा Dream11 वर टीम बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अपयश आले तरी 2017 च्या IPL मध्ये त्याने तब्बल 3 लाख रुपये कमावले. धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीच्या काळात नवीन फोन घेण्यासाठी त्याने स्वतःच्या काकांची सोन्याची साखळी चोरून विकली होती.
यूट्यूब चॅनेल आणि फँटसी ॲप्सचे प्रमोशन
अनुरागने 2017 मध्ये आपले नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केले, जिथे तो क्रिकेट सामन्यांचे अंदाज (Predictions) आणि टिप्स देऊ लागला. हळूहळू त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तो प्रसिद्ध झाला. त्याने हाउजॅट, व्हिजन-11 आणि बॅटबॉल-11 सारख्या फँटसी ॲप्सचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केले. कमी पैसे लावणारे युजर्स जिंकायचे, पण मोठी रक्कम लावताच लोकांचे पैसे फसायचे, अशा वादांमध्येही त्याचे नाव आले. मात्र, यातून अनुरागने कोट्यवधींची कमाई केली.
हेही वाचा – Odisha Maoists Surrender : ओडिशा सरकारचे मोठे यश! बक्षिसाच्या रकमेत वाढ करताच 22 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
ईडीची कारवाई आणि बेहिशोबी मालमत्ता
अनुरागची अचानक बदललेली जीवनशैली, परदेश दौरे आणि कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांमुळे तपास यंत्रणांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. ईडीने नुकत्याच केलेल्या कारवाईत त्याच्या 4 महागड्या गाड्या जप्त केल्या असून त्याच्या बँक खात्यांतील 3 कोटींहून अधिक रक्कम गोठवली आहे. अनुरागने बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या (Online Betting) माध्यमातून ही मालमत्ता जमवल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 3 जणांना अटक झाली असून एकूण 23.7 कोटींची संपत्ती गोठवण्यात आली आहे.
हवाला कनेक्शन आणि दुबईतील गुंतवणूक
तपासात असे समोर आले आहे की, अनुरागने हवाला चॅनेल आणि 'म्युल अकाउंट्स'चा वापर करून आपली कमाई दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवली आहे. अवघ्या 6 वर्षांत एका साध्या कुटुंबातील मुलाने इतकी अफाट संपत्ती कशी निर्माण केली, हा मोठा प्रश्न आहे. सध्या अनुराग दुबईत असून ईडी त्याच्या चौकशीची तयारी करत आहे. आपला पैसा मेहनतीचा असल्याचा दावा अनुराग करत असला तरी, मनी लाँड्रिंगच्या आरोपामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
आलिशान जीवनशैली आणि वादाचे वलय
अनुराग द्विवेदीची ही गोष्ट 'शून्यातून विश्व निर्माण करणे' अशी वाटत असली तरी, त्यामागील कायदेशीर बाजू आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. क्रूझवरील आलिशान लग्ने आणि परदेशातील महागड्या सहलींमुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असायचा. मात्र, ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांमुळे आता तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.