FMCG Price Hikes: दैनंदिन वापराच्या खाद्यपदार्थांपासून ते साबण-पेस्टसारख्या एफएमसीजी (FMCG) उत्पादनांच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि पाम तेलासह साखरेसारख्या कच्च्या साहित्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि डाबर यांसारख्या बलाढ्य कंपन्यांच्या महसुलावर आणि नफ्यावर प्रचंड दबाव येत आहे. जून तिमाहीत आधीच 2 ते 5 टक्के दरवाढ झालेली असतानाही, येत्या काही दिवसांत कंपन्या उत्पादनांचे भाव आणखी वाढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे महागाईचा फटका बसूनही बाजारात ग्राहकांकडून वस्तूंना असलेली मागणी अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
कंपन्यांकडून 'श्रिंकफ्लेशन'चा वापर
ग्राहकांच्या खिशाला थेट मोठा फटका बसू नये आणि विक्रीवर परिणाम होऊ नये, यासाठी कंपन्यांनी 'श्रिंकफ्लेशन' (Shrinkflation) ही विशेष रणनीती लागू केली आहे. या पद्धतीनुसार उत्पादनाची विक्री किंमत तीच ठेवली जाते, परंतु पाकिटातील वस्तूचे एकूण प्रमाण अथवा वजन कमी केले जाते. विशेषतः 5 रुपये आणि 10 रुपयांच्या छोट्या बिस्किटांच्या व खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर हे तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळे शेती उत्पादनांवर होणारा परिणाम आणि जागतिक बाजारातील इंधन दरांमधील चढ-उतार यावरही उद्योग जगताची करडी नजर आहे.
प्रमुख कंपन्यांची आगामी धोरणे आणि किमतींमधील संभाव्य बदल
विविध आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या आगामी तिमाहीचे नियोजन स्पष्ट केले आहे. ब्रिटानियाने पाम तेल आणि साखरेच्या वाढत्या किमतींमुळे चालू तिमाहीत उत्पादनांच्या दरात आणखी 1.5 ते 2 टक्के वाढ करण्याचे संकेत ब्रिटानियाने दिले आहेत. तर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) च्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे 2 ते 5 टक्के वाढ अपेक्षित असून, सप्टेंबर तिमाहीत विविध वस्तूंचे भाव वाढवून हा भार भरून काढला जाईल. याशिवाय, डाबर इंडिया आपला एकूण नफा टिकवून ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्याची योजना आखत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात कंपन्या वस्तूंच्या विक्रीच्या प्रमाणापेक्षा मूल्याधारित वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.