Donald Trump: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून निर्माण झालेल्या तीव्र आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध थेट युद्धाची घोषणा केली आहे. आज रात्री एका मोठ्या लष्करी कारवाईद्वारे इराणचा संपूर्ण भूभाग ताब्यात घेऊन तो उद्ध्वस्त केला जाईल, असा आक्रमक दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणची लष्करी ताकद आता पूर्णपणे संपुष्टात आली असून, त्यांच्याकडे रडार यंत्रणेपासून ते युद्धनौकांपर्यंत काहीही शिल्लक नसल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणचे नेतृत्वही आता उरलेले नसल्याने त्यांची स्थिती कमकुवत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेच्या सिनेटमधील अल्पसंख्याक नेते चक शुमर यांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणतीही ठोस रणनीती नसताना जुन्या चुकांची पुनरावृत्ती करून ट्रम्प अमेरिका आणि इस्रायलला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याची टीका शुमर यांनी केली.
ट्रम्प यांचा लष्करी दाव्यांचा पाढा
आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी नुकसानीचा सविस्तर दावा केला. ट्रम्प म्हणाले, 'अवघ्या 4 महिन्यांपूर्वी ज्या लोकांकडे मध्यपूर्वेतील सर्वात शक्तिशाली लष्कर होते, त्यांचे पारिपत्य करण्यात आले आहे. त्यांच्या ताफ्यातील 159 जहाजे आता समुद्रतळाशी गेली आहेत. त्यांच्याकडे लढाऊ विमानांसह 230 विमाने होती, ती सर्व आम्ही नष्ट केली आहेत. इराणची मजबूत रडार प्रणाली आणि शक्तिशाली विमान-विरोधी यंत्रणा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, त्यांचे नेतृत्वच संपवून टाकण्यात आले आहे.'
होर्मुझच्या मुद्द्यावरून अमेरिका विरुद्ध इराण आमनेसामने
होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून दोन्ही देशांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. अमेरिकेने अधिकृत भूमिका मांडताना म्हटले आहे की, होरमुझमध्ये आता 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारले जाईल, कारण अमेरिकाच 'होर्मुझच्या सामुद्रधुनीची खरी रक्षक' आहे. यासोबतच इराणी बंदरांना वेढा घालणे, इराणी जहाजांवर नवीन निर्बंध लादणे आणि इराणी भूभागावर ताबा मिळवणे यावर अमेरिका ठाम आहे. याला इराणनेही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. होरमुझवरील आपले नियंत्रण कधीही सोडणार नाही, इराण हाच या भागाचा रक्षक आहे आणि राहील, असे सांगत त्यांनी अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा आणि चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
'शांततेची अपेक्षा ठेवू नका'; नेतान्याहू यांचा इराणला अंतिम इशारा
या संपूर्ण तणावात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही इराणला थेट शब्दात धमकावले आहे. इराणने इस्रायलवर पुन्हा एकदा नवीन हल्ले करण्याचे धाडस केल्यास, त्याला अत्यंत भीषण प्रतिहल्ल्याला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार, एका परिषदेत बोलताना नेतान्याहू म्हणाले, 'मला इराणच्या सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सांगायचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला केला, तर इथली परिस्थिती शांत राहील अशी अपेक्षा करू नका.' इस्रायलवर हल्ले करायचे आणि त्याचे कोणतेही परिणाम न भोगता सुटून जायचे, ते दिवस आता कायमचे संपले आहेत, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला.