Margashirsha Month 2025 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत मोठे धार्मिक महत्त्व आहे आणि हा महिना आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात अनेक धार्मिक विधी, पूजापाठ आणि व्रत केले जातात. मार्गशीर्ष महिना हा प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाला समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती, व्रत आणि दानधर्म यांमुळे श्रीकृष्णाची विशेष कृपा होते आणि त्याचे शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक भाविक या महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात. तसेच, या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व असते. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत आणि पूजा केली जाते.
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधी?
यंदा 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya) आहे. यानंतर, शुक्रवार, 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे. हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवीचे व्रत (Mahalakshmi Vrat) करण्याची पद्धत आहे. यावर्षी मार्गशीर्षमध्ये एकूण 4 गुरुवार येणार आहेत आणि त्यातील पहिला मार्गशीर्ष गुरुवार 27 नोव्हेंबरला असेल.
मार्गशीर्ष महिन्यातील पूजा आणि दानाचे महत्त्व
या पवित्र महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेकजण या काळात श्रीकृष्णासाठी व्रत करतात. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये 'मासानाम् मार्गशीर्ष: अहम्।' असे सांगितले आहे. म्हणून या महिन्याला विशेष महत्त्व आहे.
सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर ब्रम्हमुहूर्तावर किंवा दिवसाच्या सुरुवातीला घरातील देवांची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या काळात श्रीकृष्णाच्या नामाचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच, मार्गशीर्ष महिन्यात भगवद्गीता (Bhagavad Gita) वाचली जाते.
पूजेसह दानाचे महत्त्व: या काळात अन्नदान करावे, असे शास्त्र सांगते. गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक वस्तूंचे दान करावे आणि त्यांना भोजन द्यावे. असे केल्याने पापांतून मुक्ती मिळते आणि पदरी पुण्य पडते, अशी श्रद्धा आहे.
मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत आणि उद्यापन
मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात. यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते, असे मानले जाते.
व्रत पद्धत: मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार असतील, तितके दिवस व्रत करून महालक्ष्मी देवीची चौरंगावर पूजा मांडली जाते. त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती केली जाते आणि देवीला खिरीचा नैवेद्य (Naivedya) अर्पण करून व्रत सोडले जाते.
उद्यापन: शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन (Udyapan) केले जाते. या दिवशी 7 सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावले जाते. त्यांना शृंगाराचे साहित्य, महालक्ष्मी व्रताचे कथा पुस्तक आणि केळी ओटीत घालून नमस्कार केला जातो. सुवासिनींना भोजन दिल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होते.
हेही वाचा – Tulsi Upaay: संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने हे 5 फायदे मिळतील
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)