नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, शेवटच्या क्षणी असे काहीतरी घडले ज्यामुळे परिस्थिती बदलली. दोन्ही देशांच्या सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या बातमीने सर्वांना दिलासा मिळाला. भारत आणि पाकिस्तान आता तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमत झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि 48 तासांच्या राजनैतिक चर्चेमुळे हे सर्व शक्य झाले. जेव्हा दोन देश युद्ध किंवा संघर्ष थांबवण्यास सहमत होतात तेव्हा त्याला युद्धविराम (Ceasefire) म्हणतात. युद्धबंदी म्हणजे काय आणि त्याच्या अटी काय आहेत ते जाणून घेऊयात.
भारत पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा –
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास एक दिलासादायक बातमी समोर आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीखाली दीर्घ वाटाघाटीनंतर हा करार झाला आहे, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या पुढाकाराने दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा –
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, गेल्या 48 तासांत झालेल्या तीव्र राजनैतिक चर्चेचा परिणाम म्हणून ही युद्धबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. तथापि, पाकिस्तानच्या बाजूने पंतप्रधान शेहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि सुरक्षा सल्लागार असीम मलिक यांच्याशी चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदी करण्याबाबत सहमती दर्शवली.
हेही वाचा – India Pakistan Ceasefire: भारताने स्वतःच्या अटींवर केली युद्धबंदी; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती
युद्धविराम म्हणजे काय?
आज भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर अनेकांना युद्धबंदी म्हणजे काय? किंना युद्धविराम म्हणजे काय? असा प्रश्न पडला आहे. जेव्हा दोन किंवा अधिक विरोधी पक्ष युद्ध किंवा संघर्ष थांबवण्यास सहमत होतात, याला युद्धविराम असं म्हणतात. हा करार तात्पुरता किंवा कायमचा असू शकतो. युद्धविराम कधीकधी औपचारिक कराराच्या स्वरूपात घोषित केला जातो. तसेच इतर वेळी तो फक्त परस्पर समंजसपणा किंवा मध्यस्थीद्वारे होतो. युद्धविरामाचा उद्देश हिंसाचार थांबवणे आहे जेणेकरून मानवतावादी मदत पोहोचवता येईल किंवा वाटाघाटींद्वारे शांततापूर्ण तोडगा निघू शकेल.
हेही वाचा – India- Pakistan Agree On Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
युद्धबंदीच्या अटी काय आहेत?
तज्ज्ञांच्या मते, युद्धबंदी तेव्हाच टिकाऊ ठरते जेव्हा दोन्ही बाजूंना युद्धात मोठे नुकसान होत असते. यासाठी देखरेख, सैन्य मागे घेणे आणि तृतीय पक्षाची हमी यासारख्या व्यवस्था आवश्यक आहेत. कधीकधी, काही देश त्यांच्या सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी किंवा धोरणात्मक फायदा मिळविण्यासाठी युद्धबंदीचा वापर करतात, ज्यामुळे करार लवकर तुटू शकतो. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील हा करार संपूर्ण जगासाठी दिलासा देणारा असून भविष्यात हा युद्धविराम कायमस्वरूपी शांततेत रूपांतरित होईल, अशी आशा आहे.