Donald Trump Warns Iran: ‘तेलावर ताबा मिळवणार अन् सर्व काही उद्ध्वस्त करू…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने इराणमध्ये खळबळ

5 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' जागतिक तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करेल.

Donald Trump Warns Iran: ‘तेलावर ताबा मिळवणार अन् सर्व काही उद्ध्वस्त करू…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने इराणमध्ये खळबळ

Donald Trump Warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत नवी धमकी दिली असून, यामुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 5 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' जागतिक तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर भीषण हल्ले करेल. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने, ट्रम्प यांनी इराणला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, ज्याची मुदत आता संपत आली आहे. सोमवारी (6 एप्रिल) करार निश्चित न झाल्यास 7 एप्रिलपासून इराणमध्ये 'हाहाकार' माजवू, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

'सोशल ट्रुथ'वरून थेट प्रहार: वीज प्रकल्प आणि पुलांना लक्ष्य करणार
आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांनी 'सोशल ट्रुथ' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खळबळजनक टिप्पणी केली आहे. त्यांनी 7 एप्रिल 2026 या दिवसाचा उल्लेख 'वीज प्रकल्प दिन' आणि 'पूल दिन' असा केला आहे, ज्याचा अर्थ इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे असा काढला जात आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने यापूर्वी इराणी आंदोलकांना शस्त्रे पाठवली होती. "जर त्यांनी वेळेत करार केला नाही, तर मी सर्व काही उद्ध्वस्त करण्याचा आणि तेलावर ताबा मिळवण्याचा विचार करत आहे," असे त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ठामपणे सांगितले.

धाडसी बचाव मोहिमेचा खुलासा
इराणमधून अमेरिकन हवाई दलाच्या एका कर्नलची सुटका करण्यात आल्याच्या घटनेवरही ट्रम्प यांनी भाष्य केले. इराणचे लष्कर अगदी जवळ पोहोचले असताना अमेरिकन बचाव पथकाने शत्रूच्या हद्दीत 7 तास अत्यंत जोखमीची मोहीम राबवून या अधिकाऱ्याला वाचवले. इतकेच नव्हे, तर अशाच प्रकारची दुसरी मोहीम दिवसाढवळ्या राबवून एका वैमानिकाचीही सुटका करण्यात आली. या धाडसी मोहिमांबद्दल चर्चा करण्यासाठी ट्रम्प 6 एप्रिल रोजी ओव्हल ऑफिसमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – '..तर नरकाचे दरवाजे', इराण गुरगुरला; अमेरिकेच्या 48 तासांच्या मुदतीला कचऱ्याची पेटी दाखवत थेट अणुयुद्धाची धमकी

जागतिक तेल बाजारपेठेवर संकट आणि वाटाघाटी
ट्रम्प यांच्या मते 6 एप्रिल रोजी करार होण्याची शक्यता 50-50 टक्के आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, अमेरिकेचा रोख 'तेलावर ताबा मिळवण्याकडे' असल्याने जागतिक तेल बाजारपेठेत घबराट पसरली आहे. इराणच्या वाटाघाटीकारांना सध्या मर्यादित कायदेशीर सुरक्षा देण्यात आली असली, तरी ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 7 एप्रिल हा दिवस शांततेचा असेल की विनाशाचा, याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number