Honey Singh Concert: प्रसिद्ध रॅपर आणि गायक 'यो यो हनी सिंग' याच्या मुंबईतील कॉन्सर्टभोवती आता कायदेशीर वादाचे वलय निर्माण झाले आहे. विमानतळ क्षेत्राच्या प्रतिबंधित परिसरात प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे लेझर लाइट्सचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विमानन सुरक्षेच्या (Aviation Safety) दृष्टीने धोकादायक ठरू शकणाऱ्या या कृतीमुळे आयोजकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रशासकीय इशाऱ्यांकडे आयोजकांचे दुर्लक्ष
28 मार्च 2026 रोजी वांद्रे येथील MMRDA मैदानावर हनी सिंगच्या 'माय स्टोरी – इंडिया चॅप्टर' या दौऱ्यांतर्गत कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळ परिसर जवळ असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून लेझर लाइट्स वापरण्यास स्पष्ट मनाई केली होती. मात्र, सादरीकरणादरम्यान आयोजकांनी या निर्देशांना केराची टोपली दाखवत लेझर लाइट्सचा वापर केला. याप्रकरणी पोलिसांनी 'तमन्नाझ वर्ल्डवाइड' (Tamannaaz Worldwide) या संस्थेचे प्रतिनिधी इंद्रजित सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हवाई क्षेत्राच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार (FIR), आयोजकांनी कॉन्सर्टला सुमारे 12,000 लोक उपस्थित राहतील अशी माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या 18,000 ते 20,000 च्या घरात पोहोचली. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षा व्यवस्था हाताळताना पोलिसांनी मोठी ओढताण झाली. एकीकडे गर्दीचे व्यवस्थापन आणि दुसरीकडे लेझर लाइट्सचा अनधिकृत वापर, अशा दुहेरी नियमांच्या उल्लंघनामुळे हा कार्यक्रम वादात सापडला आहे.
हनी सिंगचा 'माय स्टोरी' इंडिया टूर
मुंबईतील कार्यक्रमात हनी सिंगने 'Dope Shope', 'Blue Eyes' आणि 'Brown Rang' यांसारख्या सुपरहिट गाण्यांवर चाहत्यांना थिरकायला लावले. मुंबईनंतर आता हा दौरा देशातील इतर शहरांकडे वळणार आहे. हनी सिंग 4 एप्रिल रोजी पुण्यात, 11 एप्रिल रोजी कोटा येथे, 25 एप्रिल रोजी इंदूर येथे, 2 मे रोजी लखनौ येथे आणि 9 मे रोजी कोलकाता येथे सादरीकरण करेल. या दौऱ्याची सांगता 16 मे रोजी बंगळुरू येथे होणार आहे.