Infosys Fine: भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला फ्रान्समध्ये एका मोठ्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची अचूक नोंद ठेवण्यात अपयश आल्याने फ्रान्सच्या कामगार प्राधिकरणाने इन्फोसिसला 1,75,000 युरो (सुमारे 2 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील प्रादेशिक कामगार प्राधिकरण 'DRIEETS Île-de-France' ने ही कारवाई केली असून, इन्फोसिसने शेअर बाजाराला (Stock Exchange) दिलेल्या माहितीद्वारे या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
फ्रान्सचा 35 तासांचा कडक नियम अन् इन्फोसिसच्या प्रणालीतील त्रुटी
फ्रान्सच्या कठोर कामगार कायद्यानुसार सर्व कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची पारदर्शक आणि अचूक नोंद ठेवणे बंधनकारक आहे. तेथे आठवड्याला 35 तास काम करण्याचा कायदेशीर नियम लागू असून, ओव्हरटाइम आणि विश्रांतीच्या वेळेचा पूर्ण हिशोब ठेवणे आवश्यक असते. फ्रेंच प्राधिकरणाच्या तपासणीत इन्फोसिसच्या प्रणालीमध्ये 3 प्रमुख त्रुटी आढळल्या. यामध्ये माहिती नोंदवण्याच्या सिस्टीमची अपुरी विश्वासार्हता, अयोग्य 'ऑडिट ट्रेल' आणि कामगारांच्या वेळापत्रकावर योग्य देखरेख नसणे या गोष्टींचा समावेश आहे.
'भारतात कॉर्पोरेट गुलामगिरी'; सोशल मीडियावर युजर्सचा संताप
ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर 'वर्क-लाइफ बॅलन्स'वरून जोरदार चर्चा रंगली आहे. फ्रान्समध्ये पूर्णवेळ काम 35 तासांचे असून करारांनुसार ते जास्तीत जास्त 48 तासांपर्यंतच वाढवता येते, तसेच सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना संपर्क करणेही बेकायदेशीर मानले जाते, याकडे युजर्सने लक्ष वेधले. अनेक युजर्सनी टीका करत म्हटले की, फ्रान्समध्ये कामावर मर्यादा आल्यामुळे आता कामाचा अतिरिक्त बोजा भारतीय कर्मचाऱ्यांवर ढकलला जाईल; कारण भारतात कामाचे तास आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स'बाबत कोणतेही कडक कायदे नाहीत.
नारायण मूर्तींचे '70 तास काम' अन् चीनचे '9-9-6' मॉडेल
या दंडाच्या कारवाईमुळे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासांबद्दल केलेल्या वक्तव्यांची पुन्हा आठवण करून दिली जात आहे. मूर्ती यांनी भारतीय तरुणांना देश घडवण्यासाठी आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच चीनच्या '9-9-6' कार्यसंस्कृतीचा (सकाळी 9 ते रात्री 9, आठवड्यातून 6 दिवस काम) हवाला देत त्यांनी कठोर परिश्रमाचे समर्थन केले होते. मात्र, फ्रान्समधील या कारवाईने युरोपियन कामगार कायदे आणि भारतीय आयटी संस्कृतीतील मोठा फरक पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.