नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्तान युद्धबंदीची मोठी घोषणा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, ‘दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय डीजीएमओंना फोन केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजू जमीन, हवाई आणि समुद्रावर सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील यावर सहमती झाली. आज दोन्ही पक्षांना या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,’ असं विक्रम मिस्री यांनी सांगितलं आहे.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर एस जयशंकर यांची प्रतिक्रिया –
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शविली आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि अटल भूमिका कायम ठेवली आहे.’
India and Pakistan have today worked out an understanding on stoppage of firing and military action. India has consistently maintained a firm and uncompromising stance against terrorism in all its forms and manifestations. It will continue to do so. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2025
हेही वाचा – India- Pakistan Agree On Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची सहमती –
दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, भारत आणि पाकिस्तानने तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, असंही इशाक दार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य
अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ वाटाघाटींनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल पोस्ट केले आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत लिहिले की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीखाली दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. सामान्य ज्ञान आणि कुशल बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल दोन्ही देशांचे आभार.’