CP Radhakrishnan On Delhi Blast: नवी दिल्लीजवळील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात चिंता वाढली आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेवर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले की, “पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना प्रत्येक वेळी नशीबाची गरज भासते, पण दहशतवाद्यांना फक्त एकदाच यश मिळाले तरी मोठे नुकसान होऊ शकते.” त्यांनी या स्फोटाला वेदनादायक असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले. सी.पी. राधाकृष्णन यांनी पुढे सांगितले की, या घटनेने सर्व एजन्सी सावध झाल्या असून भविष्यात अशा हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
अल-फलाह विद्यापीठातून दोन डॉक्टरांसह तीन जणांना अटक
दिल्ली स्फोट प्रकरणी तपासाला गती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणातील अल-फलाह विद्यापीठातील दोन डॉक्टरांसह एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. विद्यापीठाच्या कामकाजात अनियमितता असल्याचे यापूर्वी यूजीसी आणि एनएएसीनेही नमूद केले होते. अटक केलेल्या डॉक्टरांमध्ये मोहम्मद आणि मुस्तकीम यांचा समावेश आहे. हे दोघेही स्फोटाचे मुख्य संशयित डॉ. उमर नबी यांच्याशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कचा शोध
दरम्यान, तपासात समोर आले आहे की मोहम्मद आणि मुस्तकीम हे डॉ. मुझम्मिल गनई यांच्याशी संपर्कात होते. गनई यांना व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणात यापूर्वीच अटक झाली आहे. हे दोघेही उमर नबीचे सहकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणा आता या नेटवर्कचा विस्तार आणि त्याची कार्यपद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मेट्रो स्टेशन हादरले
तपास अधिकाऱ्यांना लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या फुटेजमध्ये स्फोट होण्यापूर्वी आणि नंतरचे सर्व क्षण स्पष्टपणे दिसत आहेत. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की मेट्रो स्टेशनच्या आत जमिनीवर आणि भिंतींमध्ये हालचाल जाणवली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे प्रवासी काही काळ गोंधळले, घाबरले आणि एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.