Sahitya Akademi Award 2025: साहित्य अकादमीने आज 24 भारतीय भाषांमधील आपल्या प्रतिष्ठेच्या वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षीचा हिंदी भाषेतील मानाचा पुरस्कार ज्येष्ठ कथा-कादंबरी लेखिका ममता कालिया यांना जाहीर झाला आहे. ममता कालिया यांच्या 'जीते जी अलाहाबाद' या लोकप्रिय आत्मचरित्रात्मक लेखनासाठी (Memoir) त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. साहित्यातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानावर या पुरस्कारामुळे मोहर उमटवली गेली असून साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लेखिका ममता कालिया यांची फेसबुक पोस्ट: वाचकांचे मानले आभार
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ममता कालिया यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, "मित्रांनो, तुमच्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या फोनवर शुभेच्छांचा जो ओघ सुरू आहे, तो अनुभवणे ही एक दुर्मिळ घटना आहे. तुमच्या या प्रेमाची परतफेड मी केवळ अधिक चांगले साहित्य निर्माण करूनच करू शकेन. तुमचे हे आशीर्वाद मला माझे पुढील पुस्तक लिहिण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतात."
24 भारतीय भाषांमधील साहित्याचा गौरव; विविध साहित्यप्रकारांची निवड
साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये वैविध्यपूर्ण साहित्याचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 8 कविता संग्रह, 4 कादंबऱ्या, 6 कथा संग्रह, 2 निबंध संग्रह, 1 साहित्य समीक्षा ग्रंथ, 1 आत्मचरित्र आणि 2 आत्मचरित्रात्मक लेखनांचा समावेश आहे. भारतीय साहित्यातील सर्जनशीलता आणि संशोधनाला चालना देण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. ममता कालिया यांच्यासह इतर भारतीय भाषांमधील दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृतींनाही या महत्त्वपूर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.