Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक करण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे बहुप्रतिक्षित 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन. मार्च 2026 मध्ये देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास विमानासारखा आरामदायी आणि वेगवान व्हावा, या उद्देशाने ही ट्रेन तयार करण्यात आली आहे.
अत्याधुनिक बोल्स्टरलेस कोच आणि वेग
या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रथमच 'बोल्स्टरलेस' कोचचा वापर करण्यात आला आहे. ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली ताशी 160 किमी वेगाने धावतानाही ट्रेनला अत्यंत स्थिर ठेवते. यामुळे प्रवाशांना प्रवासात झटके जाणवत नाहीत आणि टेबलवर ठेवलेला चहाचा कप किंवा सामानही हलत नाही. प्रवासाचा हा अनुभव एखाद्या पंचतारांकित हॉटेल किंवा विमानासारखा प्रीमियम असणार आहे.
2026 संपेपर्यंत 12 स्लीपर ट्रेन्सचे लक्ष्य
रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2026 अखेरपर्यंत एकूण 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरू करण्याचे नियोजन आहे. या गाड्यांची निर्मिती 'भारत अर्थ मूवर्स लिमिटेड' (BEML) कडून केली जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी यात स्मार्ट सेन्सर लाईट्स बसवण्यात आल्या आहेत, ज्या केवळ चालतानाच सुरू होतात, ज्यामुळे ऊर्जेची बचत होते. याशिवाय, बायो-वॅक्युम टॉयलेट्स आणि टच-फ्री नळ यांसारख्या आधुनिक सुविधा स्वच्छता राखण्यास मदत करतील.
इमर्जन्सी (VIP) कोठ्याची सुविधा पुन्हा सुरू
रेल्वेने वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनमध्ये 'इमर्जन्सी कोटा' पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय आणीबाणी, सरकारी ड्युटी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीसाठी प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या कोट्यांतर्गत विविध श्रेणींमध्ये बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत:
AC-1: यामध्ये 4 ते 6 बर्थ आरक्षित असतील.
AC-2: यामध्ये 20 ते 30 बर्थची सोय असेल.
AC-3: यामध्ये 24 ते 42 बर्थ इमर्जन्सीसाठी ठेवले जातील.
जर चार्ट तयार होईपर्यंत कोणताही आपत्कालीन विनंती अर्ज आला नाही, तर या जागा वेटिंग लिस्ट मधील प्रवाशांना दिल्या जातील.
प्रवासाचा नवा दर्जा
वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे. सध्या या ट्रेनचा अंतिम मार्ग निश्चित झाला नसला तरी, ती देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या मार्गांवर चालवली जाईल, अशी दाट शक्यता आहे. प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासाची खात्री देणारी ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकेल.