Uttarakhand Avalanche Alert : हिमालयातील उंच शिखरांवर झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तराखंडमधील जनजीवन विसकळीत झाले आहे. पाच डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'हिमस्खलनाचा' (Avalanche) मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. राजधानी डेहराडूनसह पायथ्याशी असलेल्या भागात रविवारी दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू होता, तर डोंगराळ भागात मात्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.
धोक्याची पातळी आणि बाधित जिल्हे
चंदीगड येथील 'डिफेन्स जियोइन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट' (DGRE) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तराखंडमधील पाच जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाची दाट शक्यता आहे. यामध्ये उत्तरकाशी, चमोली आणि रुद्रप्रयाग या तीन जिल्ह्यांना 'धोक्याची पातळी-1' (Danger Level-2) मध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ या भागात हिमस्खलन होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तसेच पिथौरागढ आणि बागेश्वर या जिल्ह्यांना 'धोक्याची पातळी-1' (Danger Level-1) अंतर्गत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
बर्फाचा साचलेला थर आणि धोक्याचे इशारे
उत्तराखंडच्या डोंगराळ भागात 23 जानेवारी 2026 रोजी मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली होती. यासह डिसेंबर आणि जानेवारीतील कोरड्या हवामानाचा शेवट झाला. मात्र, त्यानंतर वारंवार होणाऱ्या हिमवृष्टीमुळे बर्फाचे थर साचून उतारावरील स्थिरता कमी झाली आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने (SEOC) स्पष्ट केले आहे की, नवीन बर्फ साचल्यामुळे जुन्या संवेदनशील भागात हिमस्खलन होण्याचा धोका झपाट्याने वाढला आहे. विशेषतः 27 जानेवारीनंतर हवामानात झालेल्या बदलांमुळे डोंगररांगांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी नियमावली
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. बर्फाच्छादित भागात राहणाऱ्या लोकांना घरांच्या आणि गोठ्यांच्या छतावर साचलेला बर्फ वेळोवेळी हटवण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून छप्पर कोसळण्याची दुर्घटना टाळता येईल. अधिक धोक्याच्या ठिकाणी उंचावरील भागात तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी किंवा खालच्या भागात स्थलांतरित व्हावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन टीमला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आले असून स्थानिक रहिवासी, गिर्यारोहक आणि पर्यटकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पर्यटकांनो, सावधान!
बर्फवृष्टीच्या काळात या भागात फिरण्यासाठी आणि बर्फाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी इथून पुढील काळात अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी माहीत करून घेणे आणि त्या पाळणे या काळात महत्त्वाचे आहे. दरवर्षी अनेक पर्यटक या भागात असुरक्षित ठिकाणी अडकून पडल्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.