Most expensive US surveillance drone MQ-4C Triton disappears over Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या युद्धविरामानंतर अवघ्या दोन दिवसांतच एका धक्कादायक घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकन नौदलाचे अत्यंत महागडे आणि प्रगत निगराणी ड्रोन, MQ-4C Triton, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून रहस्यमयीरीत्या गायब झाले आहे. उड्डाणादरम्यान या ड्रोनने अचानक आपला मार्ग इराणच्या दिशेने वळवला आणि '7700' हा इमर्जन्सी कोड पाठवल्यानंतर तो रडारवरून नाहीसा झाला. सुमारे तीन तास पर्शियन आखातात गस्त घातल्यानंतर हा ड्रोन इटलीतील आपल्या तळाकडे परतत असताना ही घटना घडली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
1600 कोटींच्या ड्रोनचे 'असं' आहे वैशिष्ट्य
MQ-4C Triton हा केवळ एक ड्रोन नसून अमेरिकेच्या सागरी निगराणीचा सर्वात मोठा कणा मानला जातो. एका ड्रोनची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स (म्हणजेच 1600 कोटी रुपयांहून अधिक) इतकी प्रचंड आहे. हा ड्रोन 50,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतो आणि सलग 24 तासांहून अधिक काळ हवेत राहून सागरी क्षेत्रावर नजर ठेवण्यास सक्षम आहे. याची रेंज 7,400 नॉटिकल मैल असून तो अनेकदा P-8A Poseidon सारख्या गस्ती विमानांना महत्त्वाची माहिती पुरवतो. अमेरिकन नौदलाकडे सध्या असे 20 ड्रोन असून भविष्यात आणखी 7 खरेदी करण्याची त्यांची योजना आहे.
युद्धाचा अवाढव्य खर्च आणि अमेरिकेची डोकेदुखी
इराणसोबतच्या या संघर्षात अमेरिकेला दर सेकंदाला अंदाजे 10,300 डॉलर्स (सुमारे 9.8 लाख रुपये) खर्च करावे लागत आहेत. दैनंदिन खर्चाचा विचार केला तर केवळ शस्त्रे आणि मिसाईल्सवरच रोज 320 दशलक्ष डॉलर्स (3,040 कोटी रुपये) उडत आहेत. याशिवाय हवाई वाहतूक आणि सागरी वाहतुकीवर दररोज अनुक्रमे 245 दशलक्ष डॉलर्स आणि 155 दशलक्ष डॉलर्स खर्च होत आहेत. अशा प्रचंड आर्थिक दबावाखाली असतानाच 1,600 कोटींचे ड्रोन गायब झाल्याने अमेरिकेच्या संरक्षण विभागाची झोप उडाली आहे.
मिसाईल डिफेन्सवर कोट्यवधींचा चुराडा
अमेरिकेच्या THAAD, पेट्रियाट आणि एजिस सारख्या अत्याधुनिक मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स चालवण्यासाठी दररोज साधारण 95 दशलक्ष डॉलर्सचा खर्च येतो. गुप्तचर यंत्रणा आणि सायबर कारवायांसाठी दिवसाला सुमारे 45 दशलक्ष डॉलर्स खर्च केले जातात. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धानंतर परिस्थिती निवळत असतानाच, या ड्रोनने इराणच्या सीमेकडे घेतलेली झेप आणि त्यानंतरचे गायब होणे यामुळे हा घातपात आहे की तांत्रिक बिघाड, यावर आता खल सुरू झाला आहे.
युद्धविराम धोक्यात?
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली करण्यास नुकतीच मान्यता दिली होती. मात्र, त्याच वेळी इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केल्याने युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये उभय देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होणार असतानाच या ड्रोनच्या घटनेने चर्चेच्या वातावरणात मिठाचा खडा टाकला आहे. हा ड्रोन इराणने पाडला की तो तांत्रिक बिघाडामुळे खाली कोसळला, याचे सत्य अद्याप गुलदस्त्यात आहे.