US Iran conflict: पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र करत अमेरिकेने इराणला लष्करी दृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी एका अत्यंत आक्रमक आणि गुप्त युद्ध आराखड्यावर काम सुरू केले आहे. पेंटागनने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हद्दीत विनाथांबा लांब पल्ल्याचे हवाई हल्ले करता यावेत, यासाठी अमेरिका इस्रायलमध्ये अतिरिक्त 'एअर-टू-एअर रिफ्यूलिंग' (हवेतच इंधन भरणारी) विमानं पाठवत आहे.
'एक्झिओस'च्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनने या महातैनातीबाबत इस्रायल प्रशासनाला आधीच पूर्वकल्पना दिली आहे. सध्या इस्रायलच्या तेल अवीवमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिणेकडील रेमन विमानतळावर अमेरिकेची 60 हून अधिक रिफ्यूलिंग विमाने सज्ज आहेत. संभाव्य इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून ही विमाने सुरक्षित तळांवर ठेवण्यात आली आहेत.
हॉर्मुज आणि इराणी तळांवर अमेरिकेचे सातत्यपूर्ण हल्ले
दुसरीकडे, अमेरिकन हवाई दलाने हॉर्मुजची सामुद्रधुनी आणि इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागात सलग सात दिवस बॉम्बवर्षाव सुरू ठेवला आहे. या कारवाईत अमेरिकेने बंदर अब्बास जवळील महत्त्वाचे 7 पूल जमीनदोस्त केले आहेत. हा परिसर इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) चा मुख्य पुरवठा केंद्र मानला जातो. या पुलांच्या विध्वंसामुळे हॉर्मुज भागात होणारा इराणी शस्त्रास्त्रांचा आणि दारूगोळ्याचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, इराणची रसद यंत्रणा कोलमडली आहे.
अमेरिकन लष्करी विमानांच्या पार्किंगवरून इस्रायलमध्ये राजकीय संघर्ष पेटला
दरम्यान, अमेरिकेच्या या अवाढव्य लष्करी हालचालींमुळे इस्रायलच्या देशांतर्गत राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या इस्रायलमध्ये उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असून व्यावसायिक विमानांची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मात्र, बेन गुरियन विमानतळावर अमेरिकेच्या अजस्र युद्ध विमानांनी जागा व्यापल्यामुळे प्रवासी उड्डाणे रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तथापि, तीन महिन्यांवर आलेल्या इस्रायली सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री मिरी रेगेव यांनी या तैनातीला जाहीर विरोध दर्शवत, प्रवासी विमानतळावरून अमेरिकेची विमाने तात्काळ हटवण्याची किंवा त्यांची संख्या कमी करण्याची आक्रमक मागणी केली आहे.