Strait of Hormuz Closed: अमेरिका आणि इराणमधील वाद आता अत्यंत टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने आज जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' जलमार्ग पूर्णपणे बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर, इराणच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी कडक इशारा दिला आहे की, या सागरी क्षेत्रातून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय तेल टँकर किंवा व्यापारी जहाजावर थेट हल्ला केला जाईल.
जागतिक स्तरावर तेल आणि वायूचे संकट; भारताची चिंता वाढली
इराणच्या या आक्रमक पावलामुळे जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil) आणि गॅसच्या किमती गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जगातील तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग असल्याने, तो बंद झाल्याने अनेक देशांमधील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतासाठी देखील हे एक मोठे आर्थिक आणि ऊर्जा संकट ठरू शकते. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा जलमार्ग रोखल्याचे समजते.
इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले
इराणच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. 'IRNA' या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, केशम (Qeshm) आणि हेंगम (Hengam) बेटांवर अमेरिकेची क्षेपणास्त्रे कोसळल्याने हे स्फोट झाले. याशिवाय, बंदर अब्बास येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुख्य हवाई दलाच्या तळाजवळही अनेक मोठे स्फोट झाल्याची नोंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारीच स्पष्ट केले होते की, इराणविरुद्ध आणखी तीव्र लष्करी कारवाई केली जाईल.
हेही वाचा – Oman Gulf Attack: ओमानच्या आखातात अमेरिकेचा जहाजावर हल्ला; 3 भारतीय खलाशांचा मृत्यू
करार रखडल्याने ट्रम्प आक्रमक; एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला
सोमवारी इराण आणि इस्रायल यांच्यात झालेल्या गोळीबारानंतर, आता पुन्हा एकदा अमेरिकेने हवाई हल्ले केल्यामुळे पश्चिम आशियातील शांतता आणि युद्धविराम पूर्णपणे धोक्यात आला आहे. या संपूर्ण आठवड्यातील ही 2 री मोठी युद्धाची घटना आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "आम्ही आज पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार प्रहार करत आहोत." ते पुढे म्हणाले की, दोन्ही देश एका कराराच्या खूप जवळ आले होते, परंतु इराणने मुद्दाम वेळकाढूपणा केला आणि आता त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. ट्रम्प यांच्या या विधानांमुळे अमेरिकेची अनिश्चित रणनीती समोर आली आहे, कारण अवघ्या 2 दिवसांपूर्वी त्यांनी संघर्ष संपवण्याचे संकेत दिले होते आणि आता थेट युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.