US Boycott G20 Summit: दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी G-20 शिखर परिषदेत अमेरिकेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा बहिष्कार जाहीर करत या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय, हिंसाचार आणि जमिनी जप्तीच्या घटनांमुळे अमेरिकन प्रतिनिधीमंडळ परिषदेत सहभागी होणार नाही.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर लिहिले, “G-20 दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जात आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. तिथे गोऱ्या शेतकऱ्यांवर हिंसाचार, हत्या आणि त्यांच्या मालमत्तेची लूट सुरू आहे, आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.” यापूर्वी ट्रम्प यांनी या परिषदेला स्वतः उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते आणि त्यांच्या जागी उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांना पाठवण्याची शक्यता होती. मात्र, व्हॅन्स देखील आता दक्षिण आफ्रिकेला जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांचे आरोप खोटे; दक्षिण आफ्रिकेची प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या विधानांनंतर दक्षिण आफ्रिकेचे सरकार बचावाच्या भूमिकेत आले आहे. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी ट्रम्प यांच्या आरोपांचे खंडन करत म्हटले, “देशात रंगभेद संपून तीन दशके झाली आहेत. गोऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा छळ होत नाही. ट्रम्प यांचे दावे पूर्णपणे असत्य आहेत.” तथापी, रामाफोसा यांनी स्पष्ट केले की, आजही गोऱ्या लोकांचा आर्थिक व सामाजिक दर्जा बहुतेक काळ्या नागरिकांपेक्षा उंच आहे आणि ‘दडपशाही’ ही कल्पना वास्तवाशी विसंगत आहे.
हेही वाचा – Donald Trump यांचा नवा दावा; 'भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली!' म्हणाले, 'मोदी एक महान व्यक्ती'
ट्रम्प प्रशासनाचा सातत्यपूर्ण आरोप
ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातही दक्षिण आफ्रिकेच्या सरकारवर अल्पसंख्याक गोऱ्या शेतकऱ्यांवरील अत्याचाराचा आरोप केला होता. अमेरिकेने दरवर्षी 7,500 निर्वासितांना प्रवेश देण्याची मर्यादा ठेवली असून, त्यापैकी मोठा भाग दक्षिण आफ्रिकन गोरे नागरिक असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
G-20 मधून दक्षिण आफ्रिकेला वगळण्याची मागणी
मियामीतील सभेदरम्यान ट्रम्प यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आणि म्हटले की, “दक्षिण आफ्रिकेला G-20 मधून बाहेर काढले पाहिजे.” त्यांनी परिषदेत समाविष्ट देशांच्या धोरणांवर टीका करत, “लोकशाही, विविधता आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांच्या नावाखाली अमेरिकेच्या हितावर गदा आणली जात आहे,” असे मत व्यक्त केले. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता, कारण त्या बैठकीचा अजेंडा ‘विविधता आणि हवामान बदल’ या विषयांवर केंद्रित होता. या निर्णयामुळे अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून, जागतिक स्तरावर यावर तीव्र चर्चा सुरू आहे.