UPSC Exam Pattern Change: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या देशभरातील उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. आयोगाने यंदाच्या परीक्षा पद्धतीत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पहिल्यांदाच, नागरी सेवा पूर्व परीक्षा (Prelims) संपल्यानंतर लगेचच 'प्रोव्हिजनल आन्सर की' (तात्पुरती उत्तरतालिका) अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. आगामी UPSC पूर्व परीक्षा 24 मे 2026 रोजी नियोजित आहे. या परीक्षेच्या समाप्तीनंतर लगेचच उमेदवार आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन तात्पुरती उत्तरतालिका तपासू शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारच्या बदलाची सातत्याने मागणी केली जात होती, ज्याची दखल आता आयोगाने घेतली आहे.
'QPRep' पोर्टलद्वारे ऑनलाईन आक्षेप घेण्याची सुविधा
नवीन नियमांनुसार, उमेदवारांना केवळ उत्तरे तपासता येणार नाहीत, तर एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर शंका असल्यास ऑनलाईन आक्षेपही नोंदवता येणार आहे. उमेदवार 31 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या हरकती किंवा सूचना आयोगाकडे पाठवू शकतात. यासाठी यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर 'क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल' (QPRep) ही ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
5 लाख उमेदवारांना फायदा; मुख्य परीक्षेचे नियोजन करणे होणार सोपे
दरवर्षी साधारणपणे 5 लाखांहून अधिक तरुण या अत्यंत कठीण पूर्व परीक्षेला सामोरे जातात. या अथांग स्पर्धेतून केवळ 12 ते 15 हजार उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी (Mains) केली जाते.
विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही
यापूर्वी पूर्व परीक्षा दिल्यानंतर नेमके किती गुण मिळतील, याचा अचूक अंदाज विद्यार्थ्यांना येत नव्हता. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा की पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेची तयारी करावी, अशा विवंचनेत उमेदवार असायचे. आता 'आन्सर की' तातडीने मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचा अंदाज येईल आणि ते पुढील अभ्यासाचे वेळेत नियोजन करू शकतील.
अध्यक्ष अजय कुमार यांचे मत
यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी या बदलाबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, परीक्षा पद्धती अधिक पारदर्शी, उत्तरदायी आणि विद्यार्थी-स्नेही बनवण्याच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरेल. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून गुणवत्तेच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड करणे आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास अधिक दृढ करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.