IT Sector Layoffs: तंत्रज्ञान क्षेत्रावर सध्या नोकरीच्या असुरक्षिततेचे गडद ढग दाटून आले आहेत. 2026 ची सुरुवात ही IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत भीतीदायक काळ ठरली आहे. अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीतच हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या आता आपला कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी आणि आपले लक्ष 'कृत्रिम बुद्धिमत्तेकडे' (AI) वळवण्यासाठी वेगाने कर्मचारी कपात (Layoffs) करत आहेत.
दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कपात
ताज्या आकडेवारीनुसार, 2026 च्या पहिल्या तिमाहीतच (जानेवारी ते मार्च) 95 कंपन्यांनी मिळून 73,200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Snap, Meta, Disney आणि Oracle सारख्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
प्रमुख कंपन्यांची आकडेवारी आणि नियोजन:
Snap : सोशल मीडिया कंपनी असलेल्या Snap ने आपल्या एकूण कर्मचारी वर्गापैकी 16 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच अंदाजे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे. या निर्णयाद्वारे वर्षाला 500 दशलक्ष डॉलर्सची बचत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Meta Platforms: Facebook ची मूळ कंपनी असलेल्या Meta ने आपल्या कॅलिफोर्निया येथील कार्यालयांमधून आणखी 198 पदे रद्द केली आहेत. यापूर्वी, केवळ जानेवारी महिन्यातच कंपनीने 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.
The Walt Disney Company: Disney च्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर, अंदाजे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी सुरू आहे.
Oracle Corporation: सर्वात मोठा धक्का Oracle कडून बसण्याची शक्यता आहे. कंपनी जगभरात 20,000 ते 30,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे.
भारतावर होणारा परिणाम
Oracle च्या कर्मचारी कपातीचा सर्वाधिक आणि सखोल परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, या निर्णयामुळे भारतातील सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने 'क्लाउड' (Cloud), 'आरोग्यसेवा' (Healthcare) आणि 'विक्री' (Sales) या विभागांतील कर्मचाऱ्यांवर याची टांगती तलवार असेल. मात्र, प्रभावित कर्मचाऱ्यांना 'सेव्हरन्स पॅकेजेस' आणि विमाविषयक लाभ दिले जातील असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कर्मचारी कपातीमागील मुख्य कारणे
तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 च्या काळात कंपन्यांनी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कर्मचारी भरती केली होती, ज्याचे आता 'ओव्हरस्टाफिंग'मध्ये रूपांतर झाले आहे. दुसरे प्रमुख कारण म्हणजे 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा' (AI) वाढता प्रभाव. कंपन्या आता मानवी संसाधनांऐवी AI च्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे अनेक तांत्रिक पदांची आवश्यकता कमी झाली आहे.