UP LPG Tanker Accident at Toll Plaza : टोल प्लाझावर एका भरधाव एलपीजी गॅस टँकरचे अचानक नियंत्रण सुटले आणि तो थेट तेथील दुभाजकाला जाऊन धडकला. या जोरदार धडकेमुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरात आगीचा एक मोठा भडका उडाला. या भीषण अपघातात आतापर्यंत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व थरारक घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही दुर्दैवी दुर्घटना कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सिहोरी टोल प्लाझा येथे घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या टँकरचा वेग प्रचंड होता आणि टोल नाक्याजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकर दुभाजकावर आदळल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच तिथे आगीचा प्रचंड गोळा तयार झाला आणि संपूर्ण टोल प्लाझा या आगीच्या कचाट्यात सापडला. याबाबतचे सविस्तर एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात कानपूरहून वाराणसीच्या दिशेने निघालेल्या टँकरला हा अपघात झाला.
टँकर चालकाचा केबिनमध्येच मृत्यू; कर्मचाऱ्यांनीही तोडला दम
आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, टँकर चालक धर्मेंद्र द्विवेदी (रा. मिर्झापूर, यूपी) याला गाडीतून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि त्याचा केबिनमध्येच होरपळून जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळी तिथे कर्तव्यावर असलेले टोल प्लाझाचे 5 कर्मचारी देखील आगीच्या ज्वालांमध्ये गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तात्काळ प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान आणखी तिघांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आलोक सिंग या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी हिरामणी सिंग (रा. रायबरेली) आणि कृष्णपाल मौर्य (रा. ललितपूर) या आणखी दोन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Gas tankers are flammable… Give way to them. Watch the video … One person died and seven others, including toll plaza employees, were injured after an LPG tanker rammed into a toll plaza, overturned and exploded on the Prayagraj-Kanpur highway in Uttar Pradesh . pic.twitter.com/h8lvzmqOxc — Dr Srinubabu Gedela (@DrSrinubabu) July 3, 2026
पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उर्वरित दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कोखराज पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रभूषण मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी सकाळी झालेल्या या अपघातातील एकूण मृतांची संख्या आता 4 झाली असून पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील गॅस टँकर्सच्या वेगाचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.